जळगाव (राजमुद्रा) : – जळगाव व रावेर लोकसभा निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी (ता. ४) होणार आहे. मतमोजणी केंद्र परिसरात मोबाइल, लॅपटॉप वा इतर कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू घेऊन जाण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
मतमोजणीच्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त राहणार आहे. (prohibited to carry electronic items in counting centre area)
जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी जळगावच्या एमआयडीसीतील एफसीआय गुदामात मंगळवारी सकाळी आठपासून सुरू होईल. मतमोजणीसाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मतमोजणी होण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. मतमोजणी केंद्रावर अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांचा कडा बंदोबस्त लावला आहे.
शिवाय मतमोजणी केंद्रावर कलम १४४ लागू केले आहे. केंद्राबाहेरील १०० मीटर परिसरात दोन किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती जमा होण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. मतदान झाल्यापासून ‘ईव्हीएम’च्या सुरक्षेसाठी त्या ठिकाणी चोख पोलिस ंदोबस्त आहे. शिवाय अधिकाऱ्यांकडून वेळोवेळी पाहणी केली जात आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई होणार आहे.
मतमोजणी अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी नियम
मतमोजणीच्या दिवशी अधिकारी व कर्मचाऱ्यांना विविध नियम पाळावे लागणार आहेत. यात केंद्रात परवानगी असलेले साहित्य नेता येणार आहे. यात पेन, पेन्सील, पांढरा कागद, नोटपॅड आणि १७ सीची दुय्यम प्रत असणे आवश्यक आहे. मतमोजणी केंद्रात मोबाईल किंवा कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू नेण्यास प्रतिबंध घातला आहे.
पाचशे पोलिसांचा बंदोबस्त
मतदान झाल्यानंतर एफसीआय गुदामात ईव्हीएम ठेवले आहेत. त्या ठिकाणी त्रिस्तरीय सुरक्षा यंत्रणा तैनात आहे. राजकीय प्रतिनिधींना प्रत्यक्ष मतमोजणी प्रक्रिया पाहता यावी, यादृष्टीनेही नियोजन केले आहे. निवडणूक निरीक्षक, जिल्हा निवडणूक अधिकारी आणि संपूर्ण सुरक्षा यंत्रणेच्या निरीक्षणाखाली ही प्रक्रिया पार पडणार आहे.
एक हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती
४ जूनला होणाऱ्या मतमोजणीस एक हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी, तसेच सुरक्षिततेच्य दृष्टीने ५०० पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय १४ टेबलवर मतमोजणी होणार आहे. टपाली मतमोजणीसाठी व इटीपीबीएस मतमोजणीसाठी ५ टेबल असणार आहेत. यासाठी जवळपास एक हजार अधिक व कर्मचारी नियुक्त केले आहेत. यात प्रत्यक्ष मतमोजणी करणारे अधिकारी व कर्मचारी, तसेच साहित्य ने-आण करणाऱ्यांचा सहभाग आहे
असे होणार राउंड (फेरी)
जळगाव लोकसभा मतदारसंघ (१९८२ मतदान केंद्रे)
विधानसभानिहाय
जळगाव शहर : बूथ ३५९ फेरी २६
जळगाव ग्रामीण : बूथ ३४० फेरी २५
अमळनेर : बूथ ३२० फेरी २३
एरंडोल : बूथ २९० फेरी २१
चाळीसगाव : बूथ ३४१ फेरी २५
पाचोरा : बूथ ३३२ फेरी २४
एकूण २६ फेरी
रावेर लोकसभा मतदारसंघ (१९०४ केंद्रे)
चोपडा : बूथ ३१९ फेरी २३
रावेर : बूथ ३१४ फेरी २३
भुसावळ : बूथ ३१६ फेरी २३
जामनेर : बूथ ३२९ फेरी २४
मुक्ताईनगर : बूथ ३२२ फेरी २३
मलकापूर : बूथ ३०४ फेरी २२
एकूण २४ फेरी