नाशिक (राजमुद्रा) : – नाशिक परिक्षेत्र पोलीस महानिरीक्षक असलेले बी. जी. शेखर यांची गेल्या वर्षाच्या अखेरीस बदली करण्यात येऊन त्यांच्या जागी दत्तात्रय कराळे यांची वर्णी लागली होती. परंतु सेवानिवृत्तीला काही महिने बाकी असतांना बदली करण्यात आल्याने बी. जी. शेखर यांनी बदली आदेशाला न्यायालयात आव्हान दिले होते. नियमानुसार सेवानिवृत्तीला काही महिने बाकी असतांना बदली होत
नसल्याचे सांगत त्यांची नियुक्ती कायम ठेवण्यात आली होती.
तदनंतरच्या काळात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने बदली प्रक्रिया थांबली होती. याच आचारसंहिता कालावधीत ३१ मे २०२४ रोजी पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर यांचा कार्यकाळ संपल्यानंतर सेवानिवृत्त झाले होते. म्हणून आचारसंहिता कालावधीत तात्पुरता पदभार रंजन कुमार शर्मा यांच्याकडे सोपवण्यात आला होता. या घडामोडींमुळे नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक कोण होणार ? याबाबत गेल्या महिन्यांपासून पोलीस विभागात उत्सुकता लागून होती.
परंतु आता देशातील निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर ०१ जून २०२४ शनिवारपासून आचारसंहिता काहीशी शिथिल करण्यात आली असल्याने अखेर आज दिनांक ०३ जून २०२४ सोमवार रोजी शासनाने पदस्थापनेचे आदेश पारित करत नाशिक परिक्षेत्र महानिरीक्षक पदी मा. श्री. दत्तात्रेय कराळे यांची नियुक्ती केली आहे. मा. श्री. दत्तात्रेय कराळे यांनी यापूर्वी जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून कार्यभार सांभाळला आहे.