जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा । शहरातील भोईटे नगर रेल्वे गेट बंद करण्यासाठी उड्डाणपुलाचे काम लवकरच हाती घेतले जाणार आहे. पिंप्राळ्याकडे जाण्यासाठी उड्डाणपुलाला आर्मची व्यवस्था करावी लागणार आहे.
यात भोईटे नगरातील चार मालमत्ता बाधित होणार असल्याने या जागा मालकांना सुनावणी साठी बोलावले जाणार आहे. राज्यसरकार व रेल्वेच्या माध्यमातून पुलाच्या कामाला तातडीने सुरुवात करण्याचे प्रयत्न सुरु झाले आहे. दरम्यान महापालिकेने उड्डाणपुलावरून पिंप्राळ्याकडे जाण्यासाठी डाव्याबाजूला आर्मची मागणी केली आहे. आर्म उभारण्यासाठी मनपाने जागा उपलब्ध करून द्यावी अशी अट असल्याचे सांगण्यात आले. महापालिका व रेल्वे अधिकाऱ्यांनी सोबत केलेल्या पाहणीत पिंप्राळा रस्त्याच्या उजवीकडील चार मालमत्ता बाधित होणार आहे. या मालमत्ता धारकांना नुकसान भरपाई देणे तसेच जागा मोजमाप करून ताब्यात घेणे आदी प्रक्रिया पालिकेला पार पाडावी लागणार आहे. काही दिवसांपूर्वी चारही जागा मालकांना सुनावणीसाठी बोलावण्यात आले होते मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढल्याने सुनावणी झाली नव्हती.