उत्तर प्रदेशप्रमाणे पश्चिम बंगालमध्ये भाजपला धक्का बसला आहे. या ठिकाणी ममता बॅनर्जी यांची जादू कायम राहिली आहे. सर्व एग्झिट पोलने बंगालमध्ये भाजप जोरदार मुसंडी मारणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. परंतु हा अंदाज फोल ठरला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे कल आता स्पष्ट होऊ लागले आहे. गेल्या दोन निवडणुकीत स्वबळावर सत्ता मिळवणाऱ्या भाजपला यंदाच्या निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. भाजपचा 400+ चा नारा आणि सर्व एग्झिट पोलचे दावे फोल ठरत आहे. इंडिया आघाडीने जोरदार मुसंडी मारली आहे. एनडीए सत्तेपर्यंत पोहचत असला तरी 2024 लोकसभा निवडणुकामध्ये चांगला फटका बसला आहे. भाजपला सर्वाधिक धक्का हक्काच्या असलेल्या उत्तर प्रदेशात बसला आहे. उत्तर प्रदेशात राम मंदिराचा मुद्दा चालला नाही. नरेंद्र मोदी सरकारचे सात मंत्री पिछाडीवर आले. २०१४ मध्ये ७१ तर २०१९ मध्ये ६२ जागा उत्तर प्रदेशात भाजपला मिळाल्या होत्या. परंतु आता ३४ जागा भाजपला मिळण्याची शक्यता आहे.
उत्तर प्रदेशात सात मंत्री पिछाडीवर
उत्तर प्रदेशात समाजावादी पार्टीने जोरदार आघाडी घेतली आहे. समाजवादी पक्ष ३५ जागांवर पुढे आहे. काँग्रेस सात जागांवर आघाडीवर आहे. भाजपचे मंत्री संजीव बालियान, स्मृती ईरानी, साध्वी निरंजन ज्योती, कौशल किशोर, अजय मिश्र टेनी, अनुप्रिया पटेल आणि महेंद्रनाथ पिछाडीवर आहेत.
उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ सरकारची कामगिरी जोरदार राहिली. उत्तर प्रदेशातील माफिया गिरी त्यांनी मोडून काढली. त्या भव्य राम मंदिर पूर्ण झाले. परंतु भाजपला स्वबळावर सत्तेपर्यंत जाण्यापासून उत्तर प्रदेशने रोखले आहे. उत्तर प्रदेशाचा निकालाने सर्व एग्झिट पोल फेल ठरवले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी वायनाड आणि रायबरेली या दोन्ही जागांवर पुढे आहेत.
बंगालमध्ये भाजपला धक्का
उत्तर प्रदेशप्रमाणे पश्चिम बंगालमध्ये भाजपला धक्का बसला आहे. या ठिकाणी ममता बॅनर्जी यांची जादू कायम राहिली आहे. सर्व एग्झिट पोलने बंगालमध्ये भाजप जोरदार मुसंडी मारणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. परंतु हा अंदाज फोल ठरला आहे. बंगालमध्ये भाजपला 26 ते 31 जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त केला होता. परंतु प्रत्यक्षात भाजपला फक्त दहा जागा मिळताना दिसत आहे.