जळगाव (राजमुद्रा) : – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चाळीसगाव येथे भाजपची महत्वपूर्ण बैठक आमदार मंगेश चव्हाण यांच्या उपस्थितीत दीड महिन्यांपूर्वी पार पडली होती. त्या बैठकीत चाळीसगाव तालुक्यातून लोकसभेच्या भाजप उमेदवार स्मिता वाघ यांना सुमारे एक लाखांचे मताधिक्य देण्याचा निर्धार देखील करण्यात आला होता. प्रत्यक्ष निवडणूक निकालात मात्र भाजपच्या उमेदवाराला चाळीसगावमधून फक्त 16 हजार 327 मते जास्त पडल्याचे दिसून आले आहे.
लोकसभा निवडणुकीतील जळगाव मतदारसंघाच्या संभाव्य भाजप उमेदवारांची नावे जाहीर झाल्यानंतर पुन्हा एकदा उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्नशील असलेले तत्कालिन खासदार उन्मेश पाटील हे नाराज झाले होते. त्याच नाराजीतून नंतर त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन शिवसेना ठाकरे गटात प्रवेश देखील केला होता. याशिवाय त्यांचे मित्र व पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पाटील यांना ठाकरे गटातर्फे जळगावचे तिकीट मिळवून दिले होते. चाळीसगावमधून पुढे आलेला एका राजकारणी जळगाव मतदारसंघात एवढी मोठ्या घडामोडी घडवून आणतो आणि थेट भाजपला आव्हान देतो म्हटल्यावर चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यात अचानक दहा हत्तीचे बळ संचारले. त्याच बळावर नंतर त्यांनी जळगावमधील लोकसभेची निवडणूक प्रतिष्ठेची करून काहीही करून भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ यांना निवडून आणण्याची भीष्म प्रतिज्ञा केली. वैयक्तिक चाळीसगावमधून एक लाखांचे मताधिक्य देण्याचा चंग सुद्धा बांधला.
प्रत्यक्ष निवडणुकीत भाजप उमेदवाराला एक लाखावरच झाले मतदान…
भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ यांना चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातून सुमारे एक लाखांचे मताधिक्य देण्याचा निर्धार आमदार मंगेश चव्हाण यांनी केला होता. परंतु, निवडणूक आघाडीवर प्रतिस्पर्धी उमेदवार करण पाटील यांच्यासाठी माजी खासदार उन्मेश पाटील यांनीही मोठी ताकद लावली. त्यामुळे भाजपला चाळीसगाव तालुक्यात मोठ्या प्रयत्नानंतरही फक्त 1,05,260 मते मिळवता आली. तुलनेत शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार करण पाटील यांना 88,933 मते मिळाली. फक्त 16 हजार 327 मतांची आघाडी भाजप उमेदवार स्मिता वाघ यांना चाळीसगावमधून घेता आली. प्रयत्नांची पराकाष्टा करूनही भाजप उमेदवाराला चाळीसगावमधून मोठे मताधिक्य न मिळाल्याने आमदार मंगेश चव्हाण यांच्यासाठी तो मोठा धक्का मानला जात आहे. त्याचे दूरगामी परिणाम विधानसभेच्या आगामी निवडणुकीवर देखील पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.