जळगांव राजमुद्रा | महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील रिक्त पदे भरणे साठी मैदानी चाचणी परीक्षा दिनांक १९/०६/२०२४ पासून संपूर्ण राज्यभर सुरु होणार आहे. उमेदवारांना विविध पदांकरिता (पोलीस शिपाई, चालक, बँडसमन, सशस्त्र पोलीस शिपाई, तुरुंग विभाग शिपाई) एका घटकात किंवा वेगवेगळ्या घटकांत अर्ज करता येणार आहे. त्यानुसार काही उमेदवारांना एकाच दिवशी अथवा लागोपाठचे दिवशी दोन पदांकरिता मैदानी चाचणी साठी हजर राहणे बाबत ची स्थिती निर्माण होवू शकते त्यामुळे काही उमेदवारांची गैरसोय होऊ नये म्हणून विशेष सूचना पोलीस दलाकडून देण्यात आले आहे.
घटक प्रमुखांना दिलेल्या सूचनांमध्ये,ज्या उमेदवारास एकच वेळी दोन पदांकरिता मैदानी चाचणीस हजर राहणे साठी सूचना दिली असेल असा उमेदवार पाहिल्या ठिकाणी हजर राहिल्या नंतर त्या उमेदवारांना दुसरी ठिकाणी वेगळी तारीख देण्याच्या सूचना करण्यात आले आहे. दुसऱ्या ठिकाणचे घटक प्रमुखांनी अशा उमेदवारांची मैदानी चाचणी घेणे बंधनकारक असणार आहे. तसेच मैदानी चाचणी ची पहिली तारीख आणि दुसरी तारीख यामध्ये किमान ४ दिवसांचे अंतर असावे. मात्र या करिता उमेदवार पहिल्या मैदानी चाचणीस हजर होता याचे लेखी पुरावे दुसऱ्या मैदानी चाचणी वेळी सादर करावे लागणार आहे.
“पोलिस भरती २०२२-२३ मधे ज्या उमेदवारांनी एका पेक्षा जास्त पदांकरिता अर्ज केले असतील, तसेच त्याची मैदानी चाचणी एकाच दिवशी आली असेल अश्या उमेदवारांना किमान ४ दिवस अंतराने वेगवेगळ्या तारखा दिल्या जाव्यात अशा सूचना देण्यात आले आहे. उमेदवारांना अडचण / शंका असल्यास त्यांनी [email protected] यावर ईमेल करावा”असे आवाहन पोलीस दलाकडून करण्यात आले आहे.