जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा| यावल तालुक्यातील किनगाव येथे सुतार काम करत असताना कटर मशीन उलटी अंगावर आल्याने उजव्या पायाला जबर मार लागून अति रक्तस्त्रावाने एका युवकाचा मृत्यू झाला. सोपान शंकर मिस्त्री (वय ३५) रा. किनगाव, यावल असे अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील किनगाव येथे रहिवासी सोपान शंकर मिस्त्री हा युवक सुतार काम करत असताना कटर मशीन उलट फिरून अंगावर आल्याने उजव्या पायाला मांडी जवळ गंभीर मार लागला. दरम्यान अतिरक्तस्त्राव झाल्याने उपचाराला नेत असताना या युवकाचा मृत्यू झाला. सदर तरुणाला जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती केले असता डॉ. अहिरे यांनी त्यास मृत घोषित केले. दरम्यान रुग्णालयात नातेवाईकांनी गर्दी केली होती. सोपान हा अविवाहित असून पश्चात भाऊ आणि त्यांचा परिवार आहे.