माजी मंत्री डॉ. सुभाष भामरेंचा पक्षात लवकरच योग्य मान-सन्मान होईल!
आमदार संजय भेगडे : धुळ्यात राम पॅलेसमध्ये भाजपची आढावा बैठक
धुळे राजमुद्रा : लोकसभेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत धुळे मतदारसंघातून भाजप महायुतीचे उमेदवार, माजी मंत्री डॉ. सुभाष भामरे यांचा निसटता पराभव झाला. असे असले, तरी लवकरच डॉ. भामरे यांचा पक्षाकडून आपल्याला योग्य मानसन्मान झालेला दिसेल, असा विश्वास राज्याचे माजी मंत्री तथा आमदार संजय भेगडे यांनी येथे व्यक्त केला.
आमदार भेगडे यांच्या उपस्थितीत रविवारी (ता. २३) येथील पारोळा रोडवरील राम पॅलेसमध्ये भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांची आढावा बैठक झाली, तीत कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. दरम्यान, प्रारंभी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त मान्यवरांनी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.
माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, लोकसभा क्षेत्रप्रमुख तथा माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, लोकसभा संयोजक नारायण पाटील, भाजपचे धुळे ग्रामीण जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, मालेगाव जिल्हाध्यक्ष निलेश कचवे, जितेंद्रसिंग गिल, भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य रवी बेलपाठक, डॉ. माधुरी बोरसे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा धरती देवरे, जिल्हा परिषद सदस्य राम भदाणे, डॉ. तुषार शेवाळे, हिरामण गवळी, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव खलाणे, तालुकाध्यक्ष रितेश परदेशी, माजी महापौर चंद्रकांत सोनार, प्रदीप कर्पे, प्रतिभा चौधरी, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य कामराज निकम, संजीवनी शिसोदे, माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर, संजय जाधव, वंदना भामरे, प्रमिला चौधरी, अमोल मासुळे, सुबोध पाटील यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रारंभी आमदार भेगडे यांनी उपस्थित कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या भावना जाणून घेतल्या. आमदार भेगडे म्हणाले, की माजी मंत्री डॉ. सुभाष भामरे यांचा यावेळी लोकसभा निवडणुकीत अवघ्या काही मतदांनी निसटता पराभव झाला. या पराभवाचे ते स्वतःला धनी मानत आहेत, हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. मात्र, त्यांच्या पराभवचे खरी धनी आम्ही सर्व कार्यकर्ते आहोत. लोकसभेच्या धुळे मतदारसंघात मालेगाव मध्यमध्ये मतदानावेळी काही गैरप्रकार झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यावर आपण लढा देऊच. मात्र, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपले मनोबल कमी होणार नाही, याची काळजी घ्यायची आहे. काहीही झाले तरी लवकरच डॉ. सुभाष भामरे यांचा पक्षाकडून योग्य तो मानसन्मान झालेला आपल्याला बघायला मिळेल. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्षाच्या माध्यमातून तळागाळातील जनतेसाठी आपले कार्य निरंतर सुरू ठेवावे. पुन्हा एकदा उभारी घेऊन आगामी विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी जिद्दीने कामाला लागावे. त्याल यश आपलेच आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
थांबायचे नाही, निरंतर कार्यरत राहू : डॉ. भामरे
माजी मंत्री डॉ. भामरे म्हणाले, की भारतीय जनता पक्षाला देशभरात अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्या असल्या, तरी पंतप्रधानपदी आपले नेते नरेंद्र मोदी यांची तिसऱ्यांदा निवड झाली, ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या १० वर्षांत सर्व समाजघटकांना न्याय मिळाला. आज भारत प्रत्येक क्षेत्रात प्रगतिपथावर असून, आपला देश जागतिक स्तरावर महासत्ता म्हणून उदयास येत आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत धुळे मतदारसंघात आपल्याला निसटता पराभव स्वीकारावा लागला. त्याचे फार विश्लेषण करणार नाही. धुळे मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. यातील मालेगाव मध्य मतदारसंघात विशिष्ट समाजाचे प्राबल्य असून, त्यांचेच १०० टक्के मतदार आहेत. तेथे दोन लाखांहून अधिक मतदान झाले. तेथे काही गैरप्रकार झाल्याचा आमचा आरोप आहे. उर्वरित पाचही विधानसभा मतदारसंघांत आपल्याला एक लाख ९० हजारांचे मताधिक्य मिळाले. ते काही कमी नाही. भाजपच महायुतीच्या खंदे कार्यकर्ते, नेते, पदाधिकाऱ्यांनी भाजपच्या विजयासाठी मनापासून प्रयत्न केले. मात्र, तरीही आलेल्या अपयशाचा धनी मी स्वतः आहे. असे असले तरी आपल्याला थांबायचे नाही. पक्षाने निरंतर कार्यरत राहण्याचा आपल्याला आदेश दिला आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत धुळे लोकसभा मतदारसंघातील पाच मतदारसंघांत आपण निवडून येऊ शकतो. त्यादृष्टीने आपल्याला प्रयत्न करून कामाला लागायचे आहे.
भाजपचे जिल्हा प्रवक्ता पृथ्वीराज पाटील यांनी सूत्रसंचालन केले, तर निलेश कचवे यांनी आभार मानले.