मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा । कोरोना, लॉकडाऊन आणि अनलॉक निर्बंधांमुळे अगोदरच त्रस्त झालेल्या देशातील सर्वसामान्य जनतेला महागाईला सामोरे जावे लागत आहे. त्यात इंधनाचे दर सातत्याने वाढतच असल्याने त्याचा परिणाम थेट दैनंदिन वापरातील आवश्यक वस्तूंच्या किंमतींवरही होताना दिसत आहे. पेट्रोलने शंभरील पार केल्यानंतर देशभरातून केंद्रातील मोदी सरकारचा निषेध नोंदविण्यात आला. मात्र, आता पेट्रोलने चक्क 105 चा आकडा गाठला आहे. त्यावरुन, रोहिणी खडसेंनी भाजपला लक्ष्य केलं आहे.
मुंबईत पेट्रोलचे दर 105 रुपयांवर पोहोचले आहेत. भाजपाने विधानसभा निवडणुकीत 105 विजयी आमदारांचे संख्याबळ गाठले होते. राज्यातील सर्वात मोठा पक्ष भाजपा ठरला होता. मात्र, नव्या राजकीय समीकरणांनी महाविकास आघाडी अस्तित्वात आली आणि भाजपला सत्तेपासून दूर राहावे लागले.
राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी पेट्रोल दरवाढीवरुन भाजपला खोचक टोला लगावला आहे. अरे पेट्रोल पण पोहोचले की 105, बहुधा आता तिथंच थांबेल ते.. असे ट्विट रोहिणी खडसे यांनी केले आहे. भाजपा आमदारांच्या संख्याबळाएवढा पेट्रोलचा प्रति लिटरचा दर आहे, त्यावरुन रोहिणी खडसेंनी भाजपला टोला लगावला आहे. दरम्यान, रोहिणी खडसे नेहमीच आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन भाजपवर टीका करतात. यापूर्वीही ओबीसी आंदोलनावरुन त्यांनी भाजपवर टीका केली होती.
दरम्यान आरटीआयमधून समोर आलेल्या माहितीनुसार, कोरोना काळात पेट्रोलियम प्रोडक्ट्सवरील कस्टम आणि एक्साइज ड्यूटीच्या माध्यमाने केंद्र सरकारच्या कमाईत 56 टक्क्यांहूनही अधिकची वाढ झाली आहे. तसेच, इनडायरेक्ट टॅक्सच्या माध्यमाने सरकारची कमाई जवळपास 2.88 लाख कोटी रुपये एवढी झाली आहे.
2020-21 मध्ये पेट्रोलियम प्रोडक्ट्सवरील इंपोर्टवर 37 हजार 806 कोटी रुपयांची कस्टम ड्यूटी वसूल केली गेली. तर सेंट्रल एक्साइज ड्यूटीच्या माध्यमाने 4.13 लाख कोटी रुपयांची कमाई झाली. तर पेट्रोलियम पदार्थांवरील इंपोर्टवर सीमा शुल्क म्हणून 46 हजार कोटी रुपयांची कमाई झाली आहे.