जळगाव राजमुद्रा | लोकसभेच्या निवडणुकीनंतर विधानसभेची धामधूम सुरू झाली आहे. अवघ्या दीड महिन्यावर येऊन ठेपलेल्या महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचे पडघम वाजणार आहे. यासंदर्भात आजच उबाटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी येत्या 41 दिवसात आचारसंहिता राज्यात लागू होईल असे सुतवाच संकेत दिले आहे. त्यानुसार राजकीय पक्षांमध्ये खलबते सुरू आहे. याच निमित्ताने जळगाव विधानसभा सध्या अधिक चर्चेत आली आहे.
उमेदवारीसाठी चर्चेत
विद्यमान आमदार असलेल्या सुरेश भोळे यांना स्वकीयांचे आवाहन निर्माण झाले आहे, हे स्वकीय स्वतःहून समोर येत नसले तरी पडद्यामागून पक्षांतर्गत तिकीट बदलाच्या चर्चा घडवून आणत आहे. एवढेच नाही तर विविध प्रसार माध्यमांमधून आगामी विधानसभेच्या निमित्ताने नाव चर्चेत यावे म्हणून अनेक उपक्रम राबवित असल्याचे प्रथम दर्शनी समोर येत आहे.
खडसेंची ताकद मिळेल काय ?
जळगाव विधानसभेचे दोन वेळा आमदार राहिलेले सुरेश भोळे जळगावच्या हृदयावर अधिराज्य गाजवीत आहे. 35 वर्षाची राजकीय कारकीर्द भूषवणारे सुरेश दादा जैन यांची राजकीय वाटचाल खालसा करून ते जळगावच्या आमदारकीच्या खुर्चीवर विराजमान झाले, यामध्ये त्यांना सर्वाधिक साथ तत्कालीन भाजप नेते एकनाथ खडसे यांची लाभली मात्र खडसे हे पुन्हा त्याच जोमाने त्यांच्यासाठी ताकत लावतील का ? हा देखील राजकीय गणिताची लिंक लावणारा सवाल आहे.
इच्छा नसताना नेतृत्व स्वीकारले
भाजपामध्ये कुठलीही गटबाजी नाही असे अनेक वेळा नेते सांगत असले, तरी खडसे – महाजन हे दोन गट भाजपामध्ये होते, मात्र खडसे यांनी राष्ट्रवादीची वाट धरल्यानंतर प्रवाहात असलेला भाजपाचा खडसे गट काहीसा शांत झाला, कारण सर्व सूत्रही मंत्री गिरीश महाजन यांच्या हाती आल्यामुळे हातातून गेलेली निर्णायक बाजू यामुळे खडसे समर्थकांची मोठी पीछेहाट झाली. भाजपमधून खडसेंची एक्झिट होत असतानाच महाजन गट चांगल्या प्रमाणात पक्षावर कमान निर्माण करत गेला, अनेकांना इच्छा नसताना महाजनांचे नेतृत्व स्वीकारावे लागले आहे.
इच्छुकांची भाऊ गर्दी,गटबाजी उफाळली
काही उर्वरित काळ गेल्यानंतर नेतृत्व जरी मंत्री महाजनांचे असले तरी जळगाव विधानसभेच्या निमित्ताने इच्छुकांच्या भाऊ गर्दीमुळे मोठ्या प्रमाणात गटबाजी उफाळल्याच पाहायला मिळाले आहे. विधानसभेमध्ये आमदार भोळे यांच्यामुळे आपले नुकसान होऊ शकते त्यामुळे भाजपच्या हातातील विधानसभा जाऊ शकते अशा नकारात्मक चर्चा अनेक भाऊ समर्थक घडवून आणत आहे.
सुरक्षा कवच
काहीं कार्यकर्त्यांनी पक्षाच्या सिम्बॉला पेक्षा भाऊचा कार्यकर्ता होणं पसंत केलं, यामुळे पक्षाचा कार्यकर्ता म्हणून टोलवाटोलवी करण्यापेक्षा पक्षात ‘ सुरक्षा कवच ‘ स्वतःसाठी तयार करून घेतला. मात्र आज देखील काही निष्ठावंत विचारांशी बांधील असल्या कारणाने ते आपल्या कार्यकर्त्याच्या भूमिकेत असून उशिरा का होईना भाऊचा कार्यकर्ता न म्हणता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून न्याय मिळेल या प्रतीक्षेत आहे.
नरेटीव्ह कोण तयार करतय ?
आमदार सुरेश भोळे यांना जर पक्षाने तिकीट दिले मग जळगाव विधानसभा भाजपच्या हातून जाणार असा पक्षांतर्गत ” नरेटीव्ह ” तयार होत आहे नेमकं हे कोण करतय ? याबाबत पक्षातील कट्टर कार्यकर्ते आपल्या पद्धतीने सांगू शकतील. ” आम्ही व्हिजन घेऊन आलो आहोत, जळगाव शहरात विविध विकास कामे करायची आहे..जळगावला अनेक महत्वपूर्ण प्रकल्प आली पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत ” अशी विविध चर्चा घडवून आणत भाजपा मधील इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी साठी चर्चांचे रान उठवले आहे. जळगाव विधानसभेचे तिकीट मंत्री गिरीश महाजन ठरवतात की राज्यातील केंद्रातील पक्षश्रेष्ठी यावर आमदार सुरेश भोळे यांची मदार असणार आहे.