जळगाव राजमुद्रा ( कमलेश देवरे ) | नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल महाराष्ट्रात महाविकास आघाडी साठी आशावादी आहे. मात्र जळगाव लोकसभेमध्ये महाविकास आघाडीला अपयश आल्याचे पाहायला मिळाल, महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार यांना उशिरा जाहीर झालेले उमेदवारी हे मुख्य कारण असल्याचे बोलले जात आहे, नियोजनासाठी कमी वेळ, सहा विधानसभेचे क्षेत्रफळ अशा अनेक बाबी कारणीभूत असल्याचे मानले जात आहे. पण आगामी विधानसभेसाठी उबाटा (शिवसेनेने) पुन्हा कंबर कसली आहे, उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. भाजपा समोर तगडे आव्हान उभे करायचे असेल तर सर्वसमावेशक असा उमेदवार देण्यासाठी जळगाव विधानसभेत उबाटा ( शिवसेना) प्रयत्नशील आहे.
हायर यंत्रणा सक्रिय
जळगाव मध्ये उबाटा (शिवसेने) कडून दिल्लीतील हायर यंत्रणा सक्रिय करण्यात आली आहे. पक्षाकडे आलेल्या नावा बाबत इच्छुकांच्या नावाची माहिती गोळा करण्याचा काम अद्याप देखील सुरू आहे. कोणत्या नावावर शिक्कामोर्तब करायचा यासाठी अंदाज बांधले जात आहे. स्थानिक महाविकास आघाडीचे व पक्षांतर्गत पदाधिकाऱ्यांना उमेदवारी बाबत विश्वासात घेतले जाणार आहे. काही इच्छुक उमेदवारांना स्थानिक पातळीवर विरोध देखील होण्याची शक्यता आहे. खबरदारी म्हणून कोणत्याही परिस्थितीत विधानसभेत जागा राखण्यासाठी उबाटा (शिवसेना) कामाला लागली आहे.
शहरातील सामाजिक गणिते
जळगाव शहरात जातीय समीकरणे महत्वपूर्ण मानले जातात, लेवा,मराठा,कोळी हे तीन समाज बहुसंख्य आहेत, राजकीय पक्षांचा कल या तीन समाजाला उमेदवारी देण्यासाठी अधिक असतो, माजी मंत्री सुरेश दादा जैन यांचा 35 वर्षाचा कार्यकाळ सोडला तर सध्याचे विद्यमान आमदार सुरेश भोळे ( राजू मामा ) गेल्या दोन टर्म पासून जळगावचे प्रतिनिधित्व करीत आहे. सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होत सुरेश जैन यांच्याविरुद्ध सुरेश भोळे यांना जळगावकरांनी पसंती दिली. आमदार भोळे हे लेवा समाजातून येतात, जळगाव हा भाजपचा गड मानला जातो, भाजपाच्या या ” अभेद्य गडाला भेद ” देण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत उबाटा ( शिवसेने) चा भगवा फडकवण्या करीता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्तिगत लक्ष घातले आहे.
आढावा घेण्याचे आदेश
गेल्या विधानसभेमध्ये जळगाव जिल्ह्यात मोठा पक्ष म्हणून उदयास आला होता, जळगाव ग्रामीण मध्ये गुलाबराव पाटील, पाचोरा – भडगाव मध्ये किशोर पाटील, पारोळ्यात चिमणराव पाटील, चोपडा येथील लता सोनवणे तसेच मुक्ताईनगर येथील शिवसेनेच्या पाठिंब्याने आमदार झालेले चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीमध्ये पाठिंबा दिला होता, जळगाव शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. जिल्ह्यात चांगले यश मिळू शकते या उद्देशाने महाविकास आघाडी मधील उबाटा (शिवसेना) जागांवर कामाला लागून आढावा घेण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी संपर्कप्रमुखांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये दिले आहे.
सावधगिरी,अंतर्गत वाद नको
लोकसभेचा निकालात चांगले यश मिळाल्यामुळे उबाटा शिवसेनेचा आत्मविश्वास अधिक वाढला आहे. जळगाव मधून उमेदवारी मिळावी म्हणून उद्धव ठाकरे यांच्यासह संपर्कप्रमुख संजय सावंत यांच्या संपर्कात इच्छुक आहेत. उमेदवारी जाहीर झाल्या नंतर कुटलाही अंतर्गत वाद नको, सावधगिरी बाळगली जाणार हे निश्चित आहे. बंडखोरी टाळण्यासाठी सावध पावले टाकली जात आहे. निवडणुकीत नुकसान टाळण्यासाठी उमेदवाराची विधानसभेच्या उमेदवारीसाठी वर्णी लागू शकते. माजी महापौर जयश्री महाजन, माजी विरोधी पक्ष नेते सुनील महाजन,उपमहापौर कुलभूषण पाटील, माजी महापौर विष्णू भंगाळे या तीन नावांची अधिक चर्चा आहे. नेमकं उमेदवारी कोणाला मिळते ? याकडे आता आगामी राजकीय समिकरण अवलंबून असणार आहे.