मुंबई : आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले असताना आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी देखील जोरदार कंबर कसली आहे. त्यांनी जनसन्मान यात्रेतून प्रत्येक मतदारसंघ पिंजून काढण्यास जोर लावला आहे.आज त्यांची जनसन्मान यात्रा नागपूर जिल्ह्यातील काटोल विधानसभा मतदारसंघात आली. माजी गृहमंत्री असलेल्या अनिल देशमुख यांच्या या मतदारसंघात त्यांची तोफ कडाडली. यावेळी त्यांनी पुढच्या पाच वर्षात लाडकी बहीण योजनेतून (Ladki Bahin Yojana) महिलांच्या खात्यात 1 लाख रुपये जमा होईल. अशी मोठी घोषणा केली.
आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी अजित दादा काटोल च्या जागेसाठी आग्रही असल्याचे दिसून येत आहे. त्यासाठीच अजित पवार यांनी जन सन्मान यात्रा काटोल विधानसभा मतदार संघात ठेवली आहे. मात्र दुसरीकडे भाजप पण काटोलच्या जागेसाठी आग्रही आहे. त्यामुळे अनिल देशमुखांच्या बालेकिल्ल्यात आज अजित पवार यांची तोफ कडाडली असल्याने या जागेवर त्यांच्या पक्षाने एकप्रकारे शड्डू ठोकला असल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे महायुतीमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या येण्याने नाराजीचा सूर असल्याचाही बोललं जात आहे.
दरम्यान विधानसभा निवडणूक झाल्यावर महायुतीचं सरकार येणार आहे. माय माऊलीं आम्हाला निवडून देणारच आहेत. तर पुढे पाच वर्षात लाडकी बहीण योजनेतून महिलांच्या खात्यात 1 लाख जमा करू असेही अजित पवार म्हणाले. तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारच्या वतीने घोषणाचा पाऊस पडला जात असल्याचे बोलले जात आहे.दरम्यान मतदारसंघात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जागावरून चांगलीचं ठिणगी पडणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.