मुंबई : आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना राज्यात राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. गेल्या पाच वर्षात राज्याच्या राजकारणात झालेल्या पक्ष फुटी, पक्षांतर्गत वाद आता पुन्हा दिसण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटीनंतर आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले (RPI Ramdas Athawale)यांच्या ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’तही ( आरपीआय ) फूट फडण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आल आहे.
विधानसभा निवडणुका तोंडावर असताना आठवले यांच्या ‘आरपीआय’तील पुणे शहर कार्यकारणीत दोन गट पडले आहेत. त्यात संजय सोनवणे हे एका गटाचे, तर शैलेंद्र चव्हाण दुसऱ्या गटाचे शहराध्यक्ष झाले आहेत.सोनवणे यांच्या गटात बाळासाहेब जानराव, माजी उपमहापौर सिद्धार्थ धेंडे, परशुराम वाडेकर, अशोक कांबळे हे नेते कार्यरत आहेत. तर, दुसऱ्या गटात माजी शहराध्यक्ष अशोक शिरोळे, माजी नगरसेविका हिमाली कांबळे, रोहिदास गायकवाड, मोहन जगताप, महिपाल वाघमारे आणि इतर कार्यकर्त्यांचा समावेश आहे. त्यामुळे आता आरपीआय मध्येही फूट पडल्याने नवीन पक्ष फुटी पाहायला मिळणार आहे.
दरम्यान याआधी 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील एका गटानं भाजपसोबत सरकार स्थापन केलं. त्यामुळे शिवसेनेत ठाकरे आणि शिंदे, असे दोन गट पडले.2023 च्या जून महिन्यात अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली एक गट महायुती सरकारमध्ये सामील झाला. त्यानंतर राष्ट्रवादीतही शरद पवारसाहेब आणि अजितदादा पवार, असे दोन गट निर्माण झाले होते. त्यानंतर आता आठवल्यांची आरपीआय ही फुटीच्या मार्गावर असल्याच दिसून येत आहे.