मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या दोन बड्या नेत्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar )यांची कोल्हापुरात भेट घेतली. यावेळी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे के.पी.पाटील(k. P. Patil )यांनी महाविकास आघाडीकडून तिकीट मिळवण्यासाठी जोरदार तयारी केली असून त्यांनी मी अजित पवारांसोबत(Ajit Pawar )कधीच गेलो नाही, त्यांच्यासोबत माझा काडीचा संबंध नसल्याचा दावा केला असल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आहे.
महायुतीकडून तिकीट न मिळाल्यामुळे नाराज असलेले के.पी पाटील यांनी महाविकास आघाडीकडून आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी मिळवण्यासाठी तयारी सुरु केली आहे.या निवडणुकासाठी ते राधानगरी मतदारसंघातून रिंगणात उतरणार आहेत. यावेळी त्यांनी शरद पवारांशी भेट घेतल्यानंतर मी राष्ट्रवादीत कधी गेलोच नाही, अजितदादा सोबत काहीच काडीचा संबंध नाही असा दावा करत मी कायम हा महाविकास आघाडीसोबतच आहे आणि राहणार असं म्हटलं आहे.
आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षातील नेत्यांचे आउटगोइंग आणि इनकमिंग सुरू झाले आहे. विधानसभा निवडणुकीसाठी राधानगरी मतदारसंघ हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सोडण्यात येणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळे के पी पाटलांना आता ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळणार का की राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.