मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय मंत्री शरद पवार(Sharad Pawar )यांनी पश्चिम महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित केल आहे. ते या निवडणुकीसाठी कोल्हापूर दौऱ्यावर आले असून आता कोल्हापुरात राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे.राजर्षी शाहू महाराजांच्या जनक घराण्याचे वंशज, भाजपचे नेते समरजित घाटगे(Samarjeet Ghatge)आज राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. आज संध्याकाळी 6 वाजता कागलमधील गैबी चौक मैदानात शरद पवार हा पक्षप्रवेश होणार आहे. त्यामुळे विधानसभेच्या तोंडावर भाजपला चांगलाच धक्का बसणार आहे
भाजप नेते समरजित घाटगे यांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात प्रवेश करण्याआधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीचा खुलासा करताना आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी मला हा निर्णय घ्यावा लागत असल्याचे सांगितले.
तसेच मी पक्ष सोडलेला नाही. पक्षच मला न्याय देऊ शकला नाही. मला उमेदवारी देऊ शकला नाही. त्यामुळे मी शरद पवार गटात जात असल्याचे त्यांनी सांगितलं.
तसेच मी विधानसभा निवडणूक लढण्यावर ठाम आहे. मी लोकांच्यासाठी लढणारा व्यक्ती आहे. मला लोकांमधून निवडून यायचं आहे. असेही ते म्हणाले. कागल- गडहिंग्लज उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या जनतेसाठी हा निर्णय घेतला आहे. आधीपासूनच अगदी राजेंच्या काळापासूनच आमचा कारभार हा पारदर्शक आहे. त्यामुळेच आमच्या साखर कारखान्याला पुरस्कार मिळालेले आहेत. त्यामुळे मला कशाचीही भीती नाही, असं समरजित घाटगे म्हणाले.
दरम्यान दुसरीकडे ज्येष्ठ नेते शरद पवार कोल्हापूर दौऱ्यावर असताना अजित पवार गटाच्या नेत्यांनीही त्यांची भेट घेतली.यावेळी के. पी. पाटील आणि ए. वाय. पाटील या दोन बड्या नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतली.त्यामुळे आता अजित पवार गटाला खिंडार पडणार का काय हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.