(राजमुद्रा जळगाव) शहरातील मनपाचे शाहूनगर परिसरातील छत्रपती शाहू महाराज रुग्णालय येथे मनपा लसीकरण केंद्र व पीपल बँकेचे शाहूनगर रुग्णालय अशी दोन रुग्णालये एकत्र असल्याकारणाने फार मोठ्या प्रमाणावर गर्दी होऊन सोशल डिस्टंसिंगचा नियम मोडला जात असल्याचे चित्र दिसत आहे. त्यानुसार हे केंद्र नूतन मराठा महाविद्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज हॉल येथे स्थलांतरित करण्यात यावे अशी मागणी हॅप्पी मिरर फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ आशिष जाधव व सामाजिक तथा आरटीआय कार्यकर्ता अनिल नाटेकर यांनी आयुक्तांना केली.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या जळगावात पाच विविध केंद्रांवर लसीकरण केंद्र उभारून नागरिकांना सुविधा दिली जात आहे. मात्र छत्रपती शाहू महाराज रुग्णालयातील मनपाचे लसीकरण केंद्र व रामदास पाटील स्मृतीसेवा संचलित पीपल बँकेचे शाहू महाराज रुग्णालय ही दोन्ही रुग्णालये एकाच ठिकाणी असल्याने मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी जमा होत आहे. या गर्दीमध्ये जर एखादा कोरोना रुग्ण असल्यास जळगावात कोरोनाचा महाविस्फोट होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. यादृष्टीने ही दोघी केंद्रे वेगवेगळी करून मनपाचे लसीकरण केंद्र हे नुतन मराठा महाविद्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज हॉल येथे स्थलांतरीत करण्यात यावे अशी मागणी हॅप्पी मिरर फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ आशिष जाधव व सामाजिक व आरटीआय कार्यकर्ता अनिल नाटेकर यांनी आयुक्तांना लेखी स्वरूपात पत्र देऊन केली आहे.
हा विषय गांभीर्याने घेऊन नागरिकांना भविष्यात होणारी कोरोनाची लागण लक्षात घेता यावर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी अशी मागणी संबंधितांकडून करण्यात आलेली आहे.