जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | फुले मार्केट मधील अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱ्या हॉकर्सवर महापालिकेचे पथक दंडात्मक कारवाई करीत आहे. दरम्यान अशाच प्रकारची कारवाई झाल्यामुळे काही दिवसांपासून आर्थिक विवंचनेत असलेल्या एका हॉकर्सने मध्यरात्री राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या प्रकाराने हॉकर्समध्ये खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार संजय मुघलदास चिमरानी (वय ३५) रा. सिंधी कॉलनी असे मृत हॉकर्सचे नाव आहे. चिमरानी हे फुले मार्केटमध्ये रेडिमेट कपडे विक्रीचा व्यवसाय करत होते. कोरोना काळात लॉकडाऊनमध्ये व्यवसाय पूर्णपणे बंद होता. अनलॉक झाल्यानंतर काही दिवस त्यांनी व्यवसाय केला. अतिक्रमण पथकाने काही दिवसांपूर्वी फुले मार्केटमधील हॉकर्सवर दंडात्मक कारवाईचे करण्याचे सत्र राबवले. यात चिमरानी यांच्यावर कारवाई होऊन त्यांचा मालक देखील जप्त करण्यात आला होता. हा माल परत मिळणार नसल्यामुळे ते आर्थिक तणावात होते. शिवाय पुन्हा व्यवसाय सुरू करणे त्यांना शक्य होणार नव्हते. दरम्यान शुक्रवारी रात्री १२:३० वाजेच्या सुमारास त्यांनी राहत्या घरात पंख्याला ओढणी बांधून गळफास घेत आत्महत्या केली. या प्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.