राजमुद्रा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah )हे नुकतेच दोन दिवस मुंबई दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यादरम्यान अजित पवार (Ajit Pawar )हे अनुपस्थितीत होते. त्यामुळे चर्चाना उधाण आले होते. त्यानंतर आता मिळालेल्या माहितीनुसार अजित पवारांनी अमित शाह हे पुन्हा दिल्लीकडे होण्यासाठी रवाना होत असताना मुंबई विमानतळावर त्यांची भेट घेतली. यावेळी मुंबई विमानतळावर अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची एक बैठक पार पडली. या बैठकीत अजित पवार यांनी त्यांच्या मनातील मुख्यमंत्रिपदाची इच्छा बोलून दाखवली. बिहार पॅटर्न राबवा, मला मुख्यमंत्रीपद द्या, असे अजित पवार म्हणाले. त्यामुळे महायुतीत आता मिठाचा खडा पडणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे. या पार्श्वभूमीवर गेंल्या काही दिवसांपासून विधानसभेच्या जागावाटपाबद्द विविध चर्चा सुरु आहेत. त्यातच आता महायुतीत जागावाटपाबद्दल अंतिम निर्णय झाल्याचे बोललं जात आहे. यात भाजप 288 पैकी जवळपास 150 जागा लढवू शकते. तर अजित पवार गटाला 70 जागा मिळू शकतात, असे बोललं जात आहे. मात्र काही जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत, त्यामुळे आम्ही या जागा सोडणार नाही. याशिवाय महाविकासाआघाडीच्या काळातील काँग्रेसच्या वाट्याच्या 10 ते 12 जागाही आम्हाला द्या, अशीही मागणी करण्यात आली. या विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान यावेळी अमित शाह यांनी लालबागचा राजाचे दर्शन घेतले होते. त्यासोबतच अमित शाह हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांच्या घरी गणपतीच्या दर्शनासाठीही गेले होते. त्यापूर्वी अमित शाह यांनी सह्याद्री अतिथीगृहावर अमित शाह आणि महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली होती. या बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.