राजमुद्रा : राज्यात विधानसभेचे वारे वाहू लागले असताना हरियाणा विधानसभा मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या जुलाना मतदारसंघात काँग्रेस आणि आम आदमी पक्षाची (आप) आघाडीची चर्चा फिसकटल्यानंतर आता दोन्ही पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसची उमेदवार विनेश फोगटच्या विरोधात आम आदमी पक्षाकडून WWE कुस्तीपटू कविता दलाल हिला निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आले आहे. त्यामुळे जुलाना विधानसभा मतदारसंघ आता कुस्तीचा आखाडा झाल्याची चर्चा आहे.
कविता दलाल यांनी २०१७ साली WWE कुस्तीच्या आखाड्यात पाऊल टाकले होते. WWE मध्ये पदार्पण करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला आहेत; तर विनेश फोगटने ऑलिम्पिकमध्ये महिला कुस्तीच्या अंतिम सामन्यात जाण्याचा विक्रम या वर्षी प्रस्थापित केला आहे. दोघीही जाट मते आपल्या बाजूला वळविण्याचा प्रयत्न करताना दिसतील. कविता दलाल या विनेश फोगटप्रमाणेच जाट समुदायाचे प्रतिनिधित्व करतात
दोन्ही कुस्तीपटू निवडणुकीच्या मैदानात आपले नशीब आजमावणार आहेत. तर, भाजपाकडून माजी वैमानिक कॅप्टन योगेश बैरागी यांना तिकीट देण्यात आले आहे. त्यामुळे जुलानाच्या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. जुलाना विधानसभा मतदारसंघाच्या आखाड्यात कोण बाजी मारणार हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.