राजमुद्रा : आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वर्षां बंगल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar )आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यात रात्री तीन तास खलबत झाली असल्याची माहिती समोर आली आहे.विधानसभा निवडणुकीप्रमाणे या बैठकीत चर्चा झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितलेला फॉर्म्युला अंमलात कसा आणायचा? या विषयावर या बैठकीत चर्चा झाल्याची
माहिती समोर आली आहे.
पुढच्या दोन महिन्यात विधानसभेच्या निवडणुकीची तारीख घोषित होऊ शकते. मात्र महायुतीत प्रत्येक पक्षाकडून वेगवेगळ्या जागांचा दावा केला जातोय. शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून याआधीच उघडपणे किती जागा हव्या याबाबत इच्छा व्यक्त करण्यात आली आहे. शिवसेनेला 100 जागा लढवायच्या आहेत तर राष्ट्रवादीला 80 जागा लढवायच्या आहेत. दुसरीकडे भाजप पक्ष 125 जागांची तयारी करत आहे. असं असताना कोणत्या पक्षाला किती जागा मिळाणार, महायुतीचा जागावाटपाचा तिढा कधी सुटणार? याकडे राज्याचं लक्ष आहे.
लोकसभा निवडणुकीत महायुतीत जागावाटपाचा तिढा लवकर सुटला नसल्यामुळे महायुतीच्या तिन्ही पक्षांना मोठा फटका बसला होता. . तसा फटका पुन्हा बसू नये यासाठी आता महायुती कामाला लागली आहे. महायुतीकडून राज्यातील सर्व 288 जागांचा आढावा घेतला जातोय. तसेच तातडीने जागावाटप निश्चित करुन कामाला लागण्याचा महायुतीचा निर्धार आहे