राजमुद्रा : आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना महाविकास आघाडीत( Mahavikas Aaghadi)मुंबईच्या जागेवरून धुसपूस सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.मुंबईतील 36 विधानसभा जागांवरुन आघाडीत पेच निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार यांच्याकडील जागांचे गणित पाहता काँग्रेसे आक्रमक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
या विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाने मुंबईतील 36 विधानसभा जागांपैकी 21 जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. तर शरद पवार गट 7 जागांसाठी आग्रही आहे. या सर्व कवायतीत काँग्रेसच्या वाट्याला अवघ्या 8 जागा उरत आहेत. त्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर वाढला आहे.
महाराष्ट्रात महाविकास आघाडीतील काँग्रेस, उद्धव ठाकरे गट, शरद पवार गट यांनी लोकसभेप्रमाणे विधानसभेतही बाजी मारण्यासाठी रणनीती आखली आहे.आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी 288 पैकी 180 पेक्षा अधिक जागा मिळतील असा दावा काँग्रेस नेत बाळासाहेब थोरात यांनी केला.महाविकास आघाडीत राज्यातील 125 जागांवर सहमती झाल्याचा दावा त्यांनी केला. तर इतर जागांवर चर्चा सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.दरम्यान आता काँग्रेसला कमी जागा मिळाल्या तर आघाडीत ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.