राजमुद्रा : विधानसभा निवडणूक तोंडावर असताना सोलापूरमध्ये राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे.सोलापुरातील माढ्याचे अजित पवार गटाचे आमदार बबनराव शिंदे यांनी मोहिते पाटलांना मोठा धक्का दिला आहे. मोहिते पाटलांच्या समर्थकांनी अजित पवार गटात प्रवेश केला आहे.ऐन निवडणुकीच्या तोंडावर बबनराव शिंदे यांना मिळणारं समर्थन वाढलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आला आहे.
महाळुंग-श्रीपुर नगरपंचायतचे नगरसेवक प्रकाश नवगिरे यांचा जनसंपर्क मोठा आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत बबनराव शिंदे यांना त्यांचा फायदा होऊ शकतो.मोहिते पाटील यांच्या माळशिरस तालुक्यात नगरपंचायतमध्ये आमदार बबनराव शिंदे गटाची नगरसेवक संख्या नगराध्यक्षांसह 8 इतकी झाली आहे.आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी अजित पवार गटाने जोरदार कंबर कसली आहे.
महायुतीचा घटक पक्ष असलेल्या अजित पवार गटाने जनसन्मान यात्रेतूनही प्रत्येक मतदारसंघापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलाय. या पार्श्वभूमीवर सोलापुरातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्ह दिसत आहेत. सोलापुरातील माढ्याचे आमदार बबनराव शिंदे हे त्यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. अशातच बबनराव शिंदे आपल्या समर्थकांची संख्या वाढवताना दिसत आहेत. महाळुंग-श्रीपुर नगरपंचायतचे नगरसेवक प्रकाश नवगिरे यांनी त्यांच्या समर्थकांसह अजित पवार गटात प्रवेश केला आहे. त्यांनी बबनराव शिंदे यांना पाठिंबा दिलाय.