जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | मुलाला शिवसेनेचा जिल्हाप्रमुख न केल्यामुळे चिमणराव पाटलांची मोठी पोटदुखी झाली असल्याचा आरोप माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते डॉ. सतीश पाटील यांनी केला आहे.
डॉ. सतीश पाटीलांनी चिमणराव पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया
व्यक्त करताना सांगितले की, “आपल्या मुलाला शिवसेनेचा जिल्हाप्रमुख करायचे असल्याने चिमणराव पाटील मुंबईत आठ दिवस ठाण मांडून होते. मात्र मुलाला पक्षश्रेष्ठींनी गेल्या दहा वर्षांपासून सक्रिय असलेले कार्यकर्ते डॉ. हर्षल माने यांना संधी दिल्याने चिमणराव पाटलांची मोठी पोटदुखी निर्माण झाली. त्यामुळे त्यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर आरोप सुरू केले”
डॉ. सतीश पाटील आज राष्ट्रवादी कार्यालयात पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, चिमणराव पाटील यांचे खरी खंत ‘मुलगा शिवसेनेचा जिल्हाप्रमुख न झाल्याने’ आहे. गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेसाठी रक्ताचे पाणी केले. चार वेळा निवडून आले आहेत. आपले दुखणे काय आहे आणि आपण काय बोलतो याचे भान राहिले नाही, असे सांगून डॉ. सतीश पाटील म्हणाले, पालकमंत्र्यांवर चुकीच्या पद्धतीने आरोप केले जात आहेत. वास्तविक ते शिवसेनेचे निष्ठावंत जुने कार्यकर्ते असल्याने पक्षश्रेष्ठींनी त्यांना न्याय दिलेला आहे. राज्यात तीन पक्षांची आघाडी सरकार आहे याची जाणीव चिमणराव पाटलांनी ठेवावी, कारण स्थानिक कार्यकर्त्याला श्रेष्ठींनी खरा न्याय दिलेला आहे. डॉ. हर्षल माने यांनी निवडणूक कालावधीत चिमणराव पाटलांना सहकार्य केले याची जाणीव त्यांनी ठेवावी असेही त्यांनी सांगितले.