राजमुद्रा : ऐन विधानसभेच्या तोंडावर नंदुरबार जिल्ह्यात भाजपला (BJP)धक्का बसला आहे.राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित (Vijaykumar Gavit) यांचे बंधू भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रकुमार गावित हे बंडखोरीच्या तयारीत असल्याची चर्चा आता नंदुरबारमध्ये रंगली आहे.यामुळे आता भाजपचे विद्यमान आमदार राजेश पाडवी यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी केली असून यासाठी आता भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र कुमार गावित यांनी शहादा-तळोदा विधानसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात त्यांनी विधानसभा निवडणूक लढण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आमदार राजेश पाडवी यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहणार आहे.
राजेंद्रकुमार गावित हे देवमोगरा एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष असून डॉक्टर विजयकुमार गावित यांचे बंधू आहेत. यापूर्वी लोकसभा निवडणुकीसाठी त्यांनी मुलाखत दिली होती. 2014 मध्ये त्यांनी शहादा-तळोदा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. पुढे 2019 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र, त्यांना निवडणुकीचे तिकीट नाकारण्यात आले. आता आगामी विधानसभेची निवडणूक आपण लढवणारच असं गावित यांनी स्पष्ट केल्याने भाजपला धक्का बसण्याची शक्यता आहे.
दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या तिकीटासाठी राजकीय नेते आतापासूनच फिल्डिंग लावत असल्याचे दिसून येत आहे. काही नेत्यांकडून पक्षाने तिकीट दिले नाही तर अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली जात आहे.