राजमुद्रा : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीन उमेदवारांची घोषणा केली होती. आता यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) विधानसभेच्या रिंगणात आपले नशीब आजमावणार आहेत.
लोकसभा निवडणुकीनंतर (Lok Sabha Election 2024) आता विधानसभा निवडणुकीचे (Maharashtra Assembly Election 2024) वारे वाहू लागले आहे. राज्यात महायुती (Mahayuti) विरुद्ध महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) असा सामना रंगणार आहे. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) या निवडणुकीत ‘एकला चलो रे’ची भूमिका घेतली आहे.
मनसेचे मध्यवर्ती कार्यालय राजगड येथे पक्षाचे नेते आणि सरचिटणीस यांची सोमवारी सकाळी बैठक पार पडली. या बैठकीत राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली.या बैठकीत सर्वांचे एकमत झाल्यानंतर मुंबईतील तीन जागांची अमित ठाकरेंसाठी चाचपणी केली जात असल्याची माहिती समोर आले आहे.. यामध्ये माहीम, भांडुप आणि मागाठणे या मतदारसंघांचा समावेश आहे. आता या विधानसभेत अमित ठाकरे नशीब अजमावणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
मनसेकडून विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईच्या शिवडीमधून पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar), पंढरपूर विधानसभेतून दिलीप धोत्रे (Dilip Dhotre) तर लातूर ग्रामीणमधून राजू उंबरकर (Raju Umbarkar) यांच्या उमेदवारीची घोषणा राज ठाकरे यांनी केली आहे.