(राजेंद्र शर्मा)
जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | राष्ट्रवादीचे माजी महानगराध्यक्ष विनोद देशमुख यांचे निलंबन मागे घेण्यात आले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षात कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्याचे वातावरण पसरले आहे. दरम्यान विनोद देशमुख यांचे पक्षाने निलंबन मागे घेतले असल्याची माहिती माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांनी आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत आज जळगावात जाहीर केली.
विनोद देशमुख यांना राष्ट्रवादी पक्षाने काही महिन्यांपूर्वी पक्षविरोधी कारवाईच्या आरोपावरून निलंबित केले होते. आता पुन्हा राष्ट्रवादीत (घरवापसी) झाल्याने पक्षात संघटनेच्या दृष्टीने त्यांची मोलाची कामगिरी राहणार आहे. राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील आणि त्यांच्या मातोश्री कल्पना पाटील यांच्यावर विनोद देशमुख यांनी आरोप केल्याने पक्षात मोठी खळबळ उडाली होती. गटबाजीला उधाण आले होते. आरोप-प्रत्यारोपांनी जिल्हा हादरला होता. आता अनेक दिवसानंतर पक्षाने त्यांना पुन्हा राष्ट्रवादीत घेतल्यामुळे या सर्व आरोपांवर पडदा पडला आहे.
विनोद देशमुख यांच्या पुनरागमनामुळे राष्ट्रवादीत कुठलीही गटबाजी राहणार नसल्याचे सांगण्यात आले असले तरी, आगामी महापालिकेच्या निवडणूका आणि स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या निवडणुका लक्षात घेऊन पक्षाने देशमुखांना संधी दिली असल्याचे बोलले जात आहे. विनोद देशमुख यांना पुन्हा येत्या मनपा निवडणुकीत उमेदवारी मिळणार असल्याचे संकेत प्राप्त झाले आहेत. त्या दृष्टीने नियोजन करण्यात आले असून पक्षश्रेष्ठींनी याबाबत सकारात्मकता दाखविली असल्याचे दिसून येत आहे.
राष्ट्रवादी पक्षात आता सक्रिय काम करणार असल्याचे विनोद देशमुख यांनी ‘राजमुद्राशी’ बोलताना सांगितले. पक्षात राहून प्रत्येक वार्डात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शाखा उघडणार, कारण शाखा ही पक्षाच्या दृष्टीने महत्त्वाची बाब असून त्या रक्तवाहिन्या असल्याचे त्यांनी सांगितले. संघटना बळकट करण्यासाठी जिल्ह्यातील ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली सक्रियपणे वाटचाल सुरू राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. विनोद देशमुख यांच्या पुन्हा वापसीमुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार असण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. कारण राष्ट्रवादी पक्ष संकटात असताना विनोद देशमुख यांची त्यांना मोलाची साथ राहिलेली आहे.
या सर्व राजकीय घडामोडीचे खरे श्रेय जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तथा राष्ट्रवादीचे युवा नेते संजय पवार यांना जात आहे. कारण संजय पवार यांच्या माध्यमातूनच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि पक्षश्रेष्ठी यांची सांगड त्यांनी योग्यवेळी घालून दिली आहे. त्यामुळे विनोद देशमुख जोमाने पक्षात सक्रिय होतील असा विश्वास संजय पवार यांनी व्यक्त केला आहे. विनोद देशमुख यांचे निलंबन मागे घेण्यासाठी जिल्हाध्यक्ष ॲड रवींद्र भैय्या पाटील, डॉ. सतीश पाटील, यांच्यासह विद्यमान महिला जिल्हा अध्यक्षा तसेच माजी जिल्हाध्यक्षा यांनी श्रेष्ठींकडे शिफारस केली. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
आगामी निवडणुकीवर डोळा ठेवून राष्ट्रवादीला जिल्ह्यात संघटना अधिक मजबूत करायची आहे. त्यासाठी राजकीय मतभेद, गटबाजी विसरून सर्वांनी एकत्र येऊन कार्य करावे, यासाठी जिल्हाध्यक्ष ॲड रवींद्र भैय्या पाटील यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांना राष्ट्रवादीतील संजय पवार यांच्यासारख्या नेत्याची मोलाची साथ लाभली यामुळे पक्ष मजबूत होईल असे लक्षात येते. निवडणुकीची जय्यत तयारी पक्षाने सुरू केली आहे. त्यादृष्टीने पक्षापासून दुखावलेले व दूर गेलेले नेते आणि कार्यकर्त्यांना पुन्हा पक्षात बोलवून स्थान देण्याचा प्रयत्न सुरू आहे. महापालिकेत सध्या राष्ट्रवादीचे अस्तित्व नाही. त्यामुळे अनेक अडचणी निर्माण होत आहेत. ही अडचण लक्षात घेऊन पक्षाने मोठी राजकीय खेळी खेळली असल्याचे एका पदाधिकाऱ्याने सांगितले.
Great educational site. Well done. where can i learn a language online for free?