राजमुद्रा : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षाकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. राज्यात महायुती (Mahayuti ) विरुद्ध महाविकास आघाडी (MVA)अशी लढत होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच आता पुण्यात भाजपाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं जोराचा धक्का दिला आहे. वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील भाजप नेते आणि माजी आमदार बापू पठारे यांनी मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये पक्ष प्रवेश केला आहे. त्या मुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
याआधी आगामी निवडणुकीत ‘तुतारी’च आपलं चिन्ह असल्याचं भाजपाच्या माजी आमदारानं जाहीर करत प्रचाराला सुरुवात देखील केली. नुकताच त्यांनी शरद पवार गटात पक्ष प्रवेश केला आहे.याआधी शरद पवारांनी कोल्हापुरात भाजपाला धक्का दिला होता. वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघांमध्ये सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे आहेत तर दुसरीकडे भाजपकडून माजी आमदार जगदीश मुळीक हे देखील आहेत. आता शरद पवार गटात प्रवेश केलेले बापू पठारे रिंगणात उतरल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे.
माजी आमदार बापू पठारे यांचा खराडीचे सरपंच ते आमदार असा राजकीय प्रवास घडला. त्यांचे वडील तुकाराम पठारे, भाऊ पंढरीनाथ आणि ते स्वतः असे तिघेही खराडीचे सरपंच होते. पुण्याचं ‘आयटी हब’ म्हणून खराडीची ओळख आहे. या विकासाच्या टप्प्यात बापू पठारे यांनी खराडीचा चेहरामोहरा बदलला. पुणे महापालिकेचे नगरसेवक, शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष, स्थायी समितीचे अध्यक्ष आणि आमदार अशी पदे त्यांनी भूषवली. आता ते विधानसभेच्या निवडणुकीत नशीब आजमावणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे