राजमुद्रा : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार तयारी सुरू झाली असून महायुतीचा घटक पक्ष असलेला अजितदादांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चांगलाच तयारीला लागला आहे. या पार्श्वभूमीवर आता महायुतीचा सुरक्षित मतदारसंघ असलेल्या नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar )यांच्या पक्षाच्या नेत्या आभा पांडे (Abha Pande) यांनी निवडणूक लढवण्यासाठी दंड थोपटले आहेत.. आता अजितदादांनी थांबवलं, तरी भाजप आमदाराविरोधात निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे आभा पांडे या भाजपच्या मतदारसंघात बंडखोरी करणारच हे जवळपास निश्चित झाले आहे.
या मतदारसंघात गेली १५ वर्ष आमदार असलेल्यांनी काय विकास केला, ३ तासांच्या पावसात नागपूर तुंडूब भरलं, नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला आहे, कचऱ्याचा मोठा प्रश्न आहे, या आमदारांनी गेल्या १५ वर्षांत जनतेचे प्रश्न सोडवले नसल्याचा आरोप देखील आभा पांडे यांनी केला आहे. जनतेने केलेल्या आग्रहामुळे मी या निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे, भाजप या जागेवरील दावा सोडो अथवा न सोडो मी या निवडणुकील उभी राहणार आहे असे म्हणत त्या यावेळी विधानसभेच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांची ही भाजप विरुद्धची बंडखोरी विधानसभेत नशीब आजमावून देणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सध्या नागपूर पूर्व या विधानसभा मतदारसंघात भाजप आमदार कृष्णा खोपडे (Krishna Khopde) यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या व राज्य महिला आयोगाच्या सदस्या आभा पांडे यांनी विधानसभा निवडणुकीत उभं राहण्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे नागपूर पूर्व या भाजपच्या अत्यंत सुरक्षित गडात राष्ट्रवादी काँग्रेस बंडखोरी करण्याच्या तयारीत असल्याचं दिसून आलं आहे.