राजमुद्रा ; आगामी विधानसभेच्या पार्शवभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज सर्व आमदारांची देवगिरी निवासस्थानी संध्याकाळी बैठक बोलावली आहे. या आजच्या बैठकीत महायुतीमध्ये (Mahayuti) काम करताना सर्वांशी जुळवून घ्या, अशा सूचना अजित पवार देणार असल्याची माहिती मिळत आहेत.महायुतीने जाहीर केलेल्या महामंडळ वाटपात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महामंडळ न मिळाल्यामुळे नाराजी आहे. त्यामुळे आजची बैठक विधानसभा निवडणूक आणि पक्षांतर्गत नाराजी या अनुषंगाने महत्त्वाची आहे.
विधानसभेच्या तोंडावर महायुतीमध्ये जागावाटपावरून धुसफूस आणि वाद असल्याची माहिती होती .. यावर काही दिवसांपूर्वी मंत्री अमित शाह यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादीसोबत जुळवून घ्या अशा सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आज अजित पवार आपल्या सर्व आमदारांना एकत्रित करून महायुतीमध्ये काम करण्याबाबत तसेच घटक पक्षातील इतर पदाधिकाऱ्यांसोबत जुळवून घेण्याबाबत सूचना देणार आहेत. यावेळी महामंडळ वाटप याबाबत देखील चर्चा होणार आहे .
नुकतंच महामंडळ वाटपात फक्त शिवसेनेच्या आमदारांना संधी देण्यात आली. यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादीच्या एकाही नेत्याचं नाव नाही. राष्ट्रवादीच्या नेत्यांना डावललं जातंय का ? यावर राष्ट्रवादी नेते प्रफुल पटेल यांनी विचारले असता, आमचे कुठलेली आमदार नाराज नाही. आम्हाला आता लोकांपर्यंत जायचं आणि त्यांचा आशीर्वाद मागायचं आहे. हे सगळे विषय बाजूलाच केलेले बरं. आपपल्या मतदारसंघांमध्ये काम करून लोकांच्या विश्वास अर्जित केलं पाहिजे. असे प्रफुल पटेल गोंदियात म्हणाले आहेत,मात्र महामंडळात डावल्याच्या या चर्चांना उधाण आले आहे. या संदर्भात देखील चर्चा होण्याची शक्यता आहे.