राजमुद्रा : राज्यात विधानसभेचे वारे वाहू लागले असताना सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. असंच सध्या महायुती (Mahayuti )आणि महाविकास आघाडीत(MVA) जागा वाटपावरून चर्चा सुरू आहे. अशातच आता माहितीचा जागावाटपाचा तिढा सुटला असल्याची माहिती मिळाली आहे.महायुतीत 288 पैकी 168 जागांवर जागा वाटपाचा कोणताही वाद नसल्याची माहिती मिळत आहे. 168 मतदारसंघात महायुतीतील मित्र पक्षांपैकी एकाच पक्षाने त्या त्या जागेवर दावा केल्याने या 168 जागेवरच जागावाटपाचा तिढा सुटला आहे.
दरम्यान दुसरीकडे महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या चर्चेसाठी आज बैठक होणार आहे. विद्यमान आमदार आणि मोठ्या नेत्यांचे जवळपास 120 मतदारसंघाच्या जागा निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. आज उरलेल्या जागांबाबत बैठकीत चर्चा होणार आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुती (Mahayuti) विरुद्ध महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) असाच सामना रंगणार असल्याचे चित्र आहे.
महाविकास आघाडीत कोकणातल्या तीन जागांवरून रस्सीखेच आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन जागांवर दावे-प्रतिदावे सुरु आहेत. चिपळूण, सांवंतवाडीवर शरद पवार गटाचा दावा तर राजापूरसाठी काँग्रेस आग्रही आहे. सावंतवाडी, राजापूरची जागा ठाकरे गट हातची जाऊ देणार का? असा सवाल उपस्थित होत असून जागा सोडवून घेऊ, असे आश्वासन काँग्रेस आणि शरद पवार गटाच्या वरिष्ठांनी स्थानिक नेत्यांना दिले आहे.आता महाविकास आघाडीत या जागांचा तिढा कधी सुटणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.