राजमुद्रा : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला आहे. या निवडणुकीसाठी आता तिसऱ्या आघाडीची पुण्यात आज बैठक होत आहे. संभाजीराजे छत्रपती , बच्चू कडू आणि राजू शेट्टी यांची एकत्रित बैठक होणार आहे. या बैठकीत राज्यातील विविध प्रश्नांवर चर्चा होणार आहे. याबाबत आघाडीतील नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून 18 मागण्याचा प्रस्ताव दिला आहे. अजून काही त्यावर उत्तर आलेलं नाही. पण ते प्रश्न सोडवण्याची त्यांची मानसिकता दिसत नाही. जर प्रश्न सुटला नाही तर तिसरी आघाडी म्हणून निवडणूक लढवणार असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. त्यामुळे विधानसभेसाठी तिसरी आघाडी रिंगणात उतरणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
या तिसऱ्या आघाडीच्या बैठकीत यंदा झालेल्याअतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांचं मोठं नुकसान झालं आहे. शेतकरी हवालदिल आहे. राजू शेट्टी, बच्चू कडू आणि संभाजीराजे यांनी दहा दिवसांआधी पाहणी केली. या ओल्या दुष्काळाच्या केलेल्या पाहणीबाबत या चर्चा होणार आहे. तसंच आगामी विधानसभा निवडणुकीवरही चर्चा होणार आहे. त्यामुळे या बैठकीनंतर काय घडतं? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
आगामी विधानसभेत महायुती आणि महाविकास आघाडी असा सामना रंगणार असला तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 18 मागण्यांचा प्रस्ताव मान्य नाही केला तर तिसरी आघाडी रिंगणात उतरणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत काय होणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे