राजमुद्रा : राज्यात विधानसभेचे वारे वाहू लागले असताना अनेक उमेदवार निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत.अशातच आता मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी विधानसभा रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. ते आज काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत. विशेष म्हणजे ते वर्सोवा विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे बोललं जात आहे.आज संध्याकाळी 4 च्या सुमारास संजय पांडे हे काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असून हा पक्षप्रवेश मुंबईत पार पडणार आहे.
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी काही महिन्यांपूर्वी फेसबुकवर एक पोस्टही शेअर केली होती. त्यात त्यांनी विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराला सुरुवात केल्याचे म्हटलं होतं. “आज वर्सोवा येथे झुलेलाल मंदिरातून वर्सोवा विधानसभा मतदारसंघासाठी प्रचाराची सुरुवात केली आहे. कुठलाही पक्ष नाही, पण आम्ही प्रयत्न करू…”, अशा आशयाची पोस्ट त्यांनी केली होती. त्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.. अखेर आता ते काँग्रेसमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणामुळे चर्चेत असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी राजकीय इनिंग सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता ते विधानसभा निवडणुकीत आपले नशीब आजमावणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तर दुसरीकडे विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना पक्षातील नेत्यांचे आमदारांचें इनकमिंग आणि आउटगोइंग सुरू झाले आहे.