राजमुद्रा : गणेशोत्सवानंतर आता मुंबईतील छत्रपती शिवाजी पार्क मध्ये होणाऱ्या दसरा मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.शिवसेनेसाठी दसरा मेळावा हा अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जातो. येत्या 12 ऑक्टोबर रोजी दसरा असून आता फक्त 20 च दिवस शिल्लक आहेत.आता या दसरा मेळाव्यासाठी फक्त ठाकरे गटाकडूनच अर्ज करण्यात आला आहे. मात्र अद्याप या मेळाव्याला मुंबई महापालिकेकडून परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
दसरा मेळाव्यावरून शिवसेनेच्या दोन गटात प्रतिष्ठेची लढाई झाली होती.. शिवसेनेच्या दोन गटांपैकी कोणाला सभा घेण्यास परवानगी मिळणार याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र यावेळी फक्त शिवसेनेच्या ठाकरे गटानेच छत्रपती शिवाजी महाराज पार्कसाठी पालिका प्रशासनाकडे अर्ज सादर केला आहे. ठाकरे गटाकडून तीन महिन्यांपूर्वीच याबद्दलचा अर्ज दाखल करण्यात आलाअसून अद्याप त्यावर पालिकेने कोणताही निर्णय घेतलेला नाही, अशी माहिती ठाकरे गटाचे शिवसेनेचे विभाग प्रमुख महेश सावंत यांनी दिली. अद्यापपर्यंत केवळ ठाकरे गटाचाच अर्ज आला असल्याची माहिती पालिकेतील सूत्रांनी दिली. मात्र तरीही निर्णय न झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
शिवसेनेचे दोन गट पडल्यानंतर २०२२ ला झालेल्या दसरा मेळाव्यात मैदानाच्या परवानगीवरून दोन गटात जोरदार वाद पहायला मिळाले होते. या दोन गटांतील वाद न्यायालयात पोहोचला होता. यानंतर ठाकरे गटाने न्यायालयात धाव घेतली. न्यायालयीन लढाईनंतर ठाकरे गटाला परवानगी देण्यात आली होती. त्या मेळाव्याला राज्यातील शिवसैनिकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. आता यंदाच्या दसरा मेळाव्यात मुंबईतील छत्रपती शिवाजी पार्कवर कोणाचा आवाज घुमणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.