राजमुद्रा : राज्यभरात विधानसभेच्या निवडणुकीचें वारे वाहू लागले असताना आता नांदेडच्या लोकसभेच्या जागेसाठीही निवडणूक होणार असल्याची माहिती समोर आली आहे..नांदेड लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे खासदार वसंत चव्हाण यांचं नुकतंच निधन झालं. त्यामुळे नांदेड लोकसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली असून या जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. वसंत चव्हाण यांच्या मुलालाच म्हणजे रवींद्र चव्हाण यांनाच लोकसभेची उमेदवारी देण्याच्या हालचाली काँग्रेसमध्ये सुरू झाल्या आहेत. त्यामुळे आता भाजप काय निर्णय घेते? भाजप उमेदवार देणार की नांदेड लोकसभा पोटनिवडणूक बिनविरोध होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या या जागेवर चर्चा करण्यासाठी आज मुंबईतील टिळक भवन येथे काँग्रेसच्या नेत्यांची बैठक पार पडणार आहे. काँग्रेसचे राज्याचे प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि नांदेड जिल्ह्यातील काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक होणार असून त्यात अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे .वसंत चव्हाण यांच्या कुटुंबातच उमेदवारी दिल्यास मतदारांची सहानुभूती मिळू शकते. त्यामुळे रवींद्र चव्हाण यांचा विजय होऊ शकतो, असा पक्षाच्या नेत्यांचा अंदाज आहे. त्यामुळे नांदेडच्या लोकसभेची उमेदवारी रवींद्र चव्हाण यांच्या गळ्यात पडण्याची शक्यता आहे.
आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून आपापल्या मतदारसंघात मोर्चेबांधणी सुरू आहे.. या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तर दुसरीकडे नांदेडची लोकसभा निवडणूक बिनविरोध होणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.