राजमुद्रा : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अनेक नवीन नवीन चेहरे समोर येत आहेत. अशातच आता बिहार पोलीस दलात 18 वर्षे काम केलेले शिवदीप लांडे (Shivdeep Lande) यांनी आपल्या आयपीएस पदाचा राजीनामा दिला आहे.भारतीय पोलीस सेवेतून राजीनामा दिल्यानंतर शिवदीप लांडे हे आता राजकारणाच्या आखाड्यात उतरण्याची शक्यता आहे.
राज्याचे मंत्री आणि शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांचे शिवदीप लांडे जावई आहेत. निवडणुकीचा आखाड्यात उतरल्यानंतर बिहारच्या कोणत्या मतदारसंघातून ते उतरणार या चर्चा सुरू असतानाच ते प्रसिद्ध निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षात प्रवेश करतील, असे सांगितले जात आहे. येत्या 2 ऑक्टोबरला गांधी जयंतीच्या दिवशी प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांच्या पक्षाचा महत्त्वाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आहे. या कार्यक्रमात बिहारमधील अनेक निवृ्त्त पोलीस आणि सनदी अधिकारी जनसुराज पक्षात प्रवेश करु शकतात. यामध्ये शिवदीप लांडे यांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.
बिहारमध्ये शिवदीप लांडे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे त्यांनी जनसुराज पक्षात प्रवेश केल्यास ते पुढील वर्षी होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकीत (Bihar Assembly Election 2024) जनसुराज पक्षाच्या तिकीटावर पाटणा शहरातील एखाद्या मतदारसंघातून लढू शकतात.. याच भांडवलाच्या जोरावर शिवदीप लांडे राजकीय आखड्यात उतरणार असल्याची चर्चा आहे.