राजमुद्रा : काही दिवसापूर्वीचं अरविंद केजरीवाल (Arvind kejriwal )यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आम आदमी पक्षाच्या झालेल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत आतिशी मार्लेना (Atishi Marlena) यांची मुख्यमंत्रिपदी निवड करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला होता. यानंतर आज अतिशी मार्ले यांनी मुख्यमंत्रिपदाची (Chief Minister) शपथ घेतली.
आतिशी यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री पदी शपथ घेण्याआधी प्रस्तावित मंत्र्यांसह अरविंद केजरीवाल यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. बैठकीनंतर आतिशी आणि इतर मंत्री पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘राज निवास’कडे रवाना झाले. आतिशी यांनी आज राजनिवास येथे इतर मंत्र्यांसोबत शपथ घेतली. त्यांच्यासोबत मंत्रिमंडळातील 5 मंत्र्यांनीही शपथ घेतली आहे. यामध्ये सौरभ भारद्वाज, कैलाश गेहलोत, गोपाल राय, मुकेश अहलावत आणि इम्रान हुसेन या नावांचा समावेश आहे.
आतिशी या अरविंद केजरीवाल यांच्या सर्वात जवळच्या नेत्या मानल्या जातात, ज्यांना निवडणुकीपूर्वी केजरीवाल यांनी आत्मविश्वासाने मुख्यमंत्रिपद दिले आहे. दरम्यान दिल्ली दारू धोरण प्रकरणात सुप्रीम कोर्टातून जामीन मिळाल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा दिला होता आणि मनीष सिसोदिया हे देखील मुख्यमंत्रीपद भूषवणार नाही असे त्यांनी सांगितले..यामुळे आतिशी यांच्याकडे मुख्यमंत्रिपद देण्यात आले आहे.