राजमुद्रा : धुळे जिल्ह्यातील निजामपूर जैताने येथे प्रेयसीच्या नातेवाईकांकडून प्रियकराची हत्या झाल्याने तणावपूर्वक वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अजय राजेंद्र भवरे हा २० वर्षीय तरुण आपल्या प्रेयसीला भेटायला गेला होता. त्यावेळी तिथे नातेवाईक आले आणि त्यांनी त्यास शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. लाथा बुक्क्यांनी आणि लाकडी दांडीने डोक्यावर मारहाण झाल्यामुळे अजय भवरे बेशुद्ध झाला. त्यानंतर मुलीच्या कुटुंबियांनी पोलिसांना बोलवून सगळी हकीकत सांगितली. त्यानंतर पोलिसांनी अजय भवरे याला शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.ही बातमी मुलाच्या कुटुंबियांना समजल्यानंतर त्याचे कुटुंबिय आणि नातेवाईकांना पोलीस ठाण्याबाहेरच ठिय्या आंदोलन केले. ज्यामुळे निजामपूर येथे तणाव पाहायला मिळाला. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करत हे निषेध आंदोलन मागे घेण्यास पीडित तरुणाच्या कुटुंबियांचे मन वळविले.
दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी अजय भवरे यांच्या कुटुंबियांची समजूत काढून आपण चार आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असल्याची माहिती दिली. तसेच जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासनही दिले.