राजमुद्रा : राज्यात विधानसभेचे वारे वाहू लागले असताना सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. या पार्श्वभूमीवरच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या ॲक्शन मोडवर आले आहेत. त्यांनी त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी मनसे नेत्यांची तातडीने बैठक बोलवली आहे. या बैठकीला प्रत्येक विधानसभा मतदारसंघांबद्दल आढावा घेतला जाणार आहे.
राज ठाकरेंनी मनसे विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर मनसेच्या बैठकींना आणि मोर्चाना जोर आला आहे तसेच याच बैठकीत राज ठाकरे यांचे सुपूत्र आणि मनसे नेते अमित ठाकरे यांच्या उमेदवारीसंदर्भातही चर्चा होण्याची शक्यता आहे. अमित ठाकरे हे वरळी विधानसभा मतदारसंघातून लढणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. त्यामुळे आता यावर शिक्कामोर्तब केले जाणार असल्याचे बोललं जात आहे.
या बैठकीला पक्षातील महत्त्वाचे नेते, सरचिटणीस आणि पदाधिकारी उपस्थित असणार आहेत. राज ठाकरे यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडणार आहे. सध्या या बैठकीला अनेक महत्त्वाचे मनसे नेते दाखल होत असल्याचे पाहायला मिळत आहेत. सध्या शिवतीर्थावर बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अविनाश अभ्यंकर, रिटा गुप्ता, संदीप देशपांडे हे नेते उपस्थित आहेत.
दरम्यान आगामी विधानसभेसाठी मनसेने उमेदवारी यादी जाहीर केली असून यामध्ये 1. शिवडी, मुंबई – बाळा नांदगावकर 2. पंढरपूर – दिलीप धोत्रे 3. लातूर ग्रामीण – संतोष नागरगोजे 4. हिंगोली विधानसभा – बंडू कुटे 5. चंद्रपूर – मनदीप रोडे 6. राजुरा – सचिन भोयर 7. वणी – राजू उंबरकर यांचा समावेश आहे.