राजमुद्रा : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार गट (Ajit Pawar Group )चांगलाच ॲक्शन मोडवर आला असून महाराष्ट्रातील 288 मतदार संघाचा त्यांच्याकडून सर्वे करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर मध्यरात्री बैठक झाली असल्याची माहिती समोर आली आहे.या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच उपस्थित नेत्यांनी विधानसभेबद्दल या आठवड्यात निर्णय घ्यावा अशी मागणी देखील त्यांना केली. त्यामुळे आता अजित पवार महायुतीतून बाहेर पडणार का? स्वबळावर निवडणूक लढणार का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
या बैठकीत अजित पवार गटाकडून संपूर्ण 288 मतदारसंघाबाबत महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादीकडून 288 मतदारसंघांचा सर्व्हे करण्यात आला आहे. यात सर्वच मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद किती याची चाचपणी केली गेली.याआधीही अजित पवारांच्या पक्षाकडून राज्यातील सगळ्या मतदारसंघांची चाचपणी करण्यात आली होती. दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार गट जोमाने तयारी लागला आहे.
दरम्यान राष्ट्रवादीत बंड करून महायूतीत सामील झालेल्या अजित पवार गटाबद्दल भाजप आणि शिंदे गटात नाराजीचा सूर पसरला आहे.
अजित पवार यांनी महायुतीमधून बाहेर पडावे, यासाठी भाजप आणि शिंदे गटाकडून पद्धतशीरपणे प्रयत्न सुरु आहेत. अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपापूर्वी बाहेर पडावे, यासाठी भाजप आणि शिंदे गटाकडून चक्रव्यूह रचण्यात येत आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.