राजमुद्रा : लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर महाविकास आघाडीत(Mahavikas Aaghadi )बाहेरील पक्षातील नेत्यांचे, आमदारांचे इनकमिंग वाढत चालले आहे. अशातच आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर इच्छुक उमेदवारांची गर्दी दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवरच आता चिंचवड पोटनिवडणुकीत बंडखोरी केलेल्या राहुल कलाटे (Rahul Kalate) यांनी यंदाची विधानसभा निवडणूक चिन्हावर लढायचं ठरवलं आहे. यासाठी त्यांनी महाविकास आघाडीत फिल्डिंग लावली असून लवकरचं त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. फक्त ते हाती तुतारी घेणार की मशाल हाती घेणार, याबाबतची उत्सुकता सर्वांना लागलेली आहे.
या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना ते म्हणाले, सध्या मी चिंचवड विधानसभेतील नागरिकांशी चर्चा करतोय, भेटीगाठी, वेगवेगळे कॅम्प, सुरू आहे, अशातच मला जर यावेळी लढताना कोणत्या पक्षांची साथ मिळाली, तर मी खूप मोठ्या फरकाने निवडून येईल असंही कलाटेंनी (Rahul Kalate) म्हटलं आहे.तसेच शरद पवारांच्या गटातील आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्यांच्या संपर्कात असल्याची त्यांनी कबुली दिली आहे. त्यामुळे राहुल कलाटे यांना ठाकरेंची मशाल की शरद पवारांची तुतारी मिळणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
दरम्यान चिंचवड पोटनिवडणुकीची पुनरावृत्ती झालीच तर पुन्हा अपक्ष नशीब अजमावण्याची तयारी कलाटें यांनी केली आहे. या विधानसभेत कलाटेंनी तुतारी फुंकावी यासाठी खासदार अमोल कोल्हे चांगलेच आग्रही असल्याचं बोललं जातं आहे. मात्र, चिंचवड पोटनिवडणुकीवेळी अजित पवारांनी केलेल्या खेळीचा अनुभव पाहता, पुन्हा तसाच दगाफटका होऊ नये. म्हणून कलाटे यांनी पूर्ण तयारीनिशी उतरण्याचा निर्णय घेतला आहे.