राजमुद्रा : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar )जोमाने मैदानात उतरले असून अजित पवार यांच्यासोबत गेलेले कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात परळी विधानसभा मतदारसंघात त्यांनी मोठा डाव टाकला आहे. या मतदारसंघात त्यांना मोठे आव्हान करत गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांचा जावई राजाभाऊ फड विधानसभेच्या रिंगणात उतरणार आहेत. त्यामुळे परळी विधानसभा मतदारसंघात धनंजय मुंडे विरुद्ध राजाभाऊ फड अशी फाईट होणार हे दिसून येत आहे.
गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांचे जावई राजाभाऊ फड उद्या मुंबईत शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. राजेभाऊ फड हे परळीतील आहेत. तसेच रासपाचे ते युवा प्रदेशाध्यक्ष राहिले असून परळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी ते इच्छुक आहेत. दरम्यान परळी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, बबन गित्ते, सुदामती गुट्टे हे देखील निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे आता शरद पवार परळी विधानसभा मतदारसंघात नेमकी कोणती खेळी खेळून उमेदवारी देणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
बीड जिल्ह्यात लोकसभेला मोठा धक्का दिल्यानंतर आता महाविकास आघाडीतील घटक पक्ष शरद पवार राष्ट्रवादी गट पुढच्या तयारीला लागला आहे. परळी मतदारसंघात शरद पवारांनी मोठा डाव टाकत अजित पवार गटात सोबत गेलेले कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना मोठे आव्हान उभे केले आहे. त्यामुळे या मतदारसंघाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.
राजाभाऊ फड हे शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यावेळी परळी मतदारसंघातून हजार कार्यकर्ते सोबत असतील असे त्यांनी स्पष्ट केले. आता सध्या पक्ष प्रवेश होत आहे. जर शरद पवार यांनी उमेदवारी दिली तर परळी मतदारसंघात ताकदीने लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शरद पवार परळी मतदारसंघासाठी स्वतः मैदानात उतरल्याने येथे त्यांचीच बाजी असणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.