राजमुद्रा : राज्यात विधानसभेचे वारे वाहू लागले असताना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढण्याचा निर्धार केला आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते जोमाने रिंगणात उतरले असून त्यांच्या पक्षात येणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे.अशातच आता महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांचे चिरंजीव गोकुळ झिरवळ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेत सहभागी झाले आहेत. त्यामुळे त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातली एन्ट्री फिक्स झाली असल्याचे चर्चांना उधाण आलं आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांची साथ सोडून झिरवळ कुटुंबीय हे शरद पवारांच्या पक्षात दाखल होणार असल्याची चर्चा दिंडोरी विधानसभा मतदारसंघात जोर धरू लागली होती. आता या चर्चांना पूर्णविराम देत खुद्द नरहरी झिरवळ यांनी आपण अजित पवारांसोबतच राहणार असल्याचें सांगितले होते. मात्र दुसरीकडे त्यांचे चिरंजीव गोकुळ झिरवळ हे त्यांच्या एका वक्तव्याने चांगलेच चर्चेत आले होते.’माझी छाती फोडली तर त्यात शरद पवार दिसतील,’असं विधान करत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात खळबळ उडवून दिली होती.त्यांनी तुतारी चिन्हावर विधानसभा निवडणूक लढण्याचे संकेत देतानाच आपण आजही शरद पवार यांच्यासोबत असल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यामुळे लवकरच ते शरद पवार गटात सक्रिय होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
दरम्यान गोकुळ झिरवळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेत सहभागी झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले,शिवस्वराज्य यात्रेत सहभागी होण्याचा निर्णय माझा स्वत:चा आहे.तसेच दिंडोरीमधून लढण्यासाठी आपण इच्छुक आहे असे देखील त्यांनी म्हटले होते. आता ते लवकरच शरद पवार गटात सक्रिय दिसणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.