जळगाव राजमुद्रा | विधानसभा निवडणुकीचे वारे राज्यप्रात पाहत आहे त्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून मोठ्या प्रमाणात इच्छुकांची भाऊ गर्दी सुरू झाली आहे अनेक आजी-माजी नगरसेवक विधानसभा लढण्यासाठी इच्छुक असून नेत्यांकडे आपली लॉबिंग लावण्यासाठी अनेक प्रयत्न करताना पाहायला मिळत आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी नगरसेवक आबा कापसे यांनी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी दंड थोपटले आहे. कोणत्याही परिस्थितीत विधानसभा निवडणूक लढवणार असा ठाम निर्धार राजमुद्राशी बोलताना त्यांनी व्यक्त केला आहे.
आबा कापसे यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत प्रथमच जाहीर वक्तव्य केल्याने भाजपामध्ये खळबळ उडाली आहे. यामुळे भाजपा अंतर्गत राजकारण तापल्याचे पाहायला मिळत आहे. विद्यमान आमदार राजू मामा भोळे यांनी पुन्हा एकदा आपल्या उमेदवारीवर दावा केला , “वरिष्ठ नेते ठरवतील ती पूर्व दिशा ” अशी देखील भूमिका आमदार राजू मामा भोळे घेऊ शकतात किंवा ” एकटा चलो रे ” चा नारा देखील देऊ शकतात. अशी राजकीय शक्यता वर्तवली जात आहे.
दोन वेळा आमदार होऊन पुन्हा एकदा तिसऱ्यांदा आमदार होण्यासाठी राजू मामा भोळे यांनी तयारी चालवली आहे. त्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न देखील चालले आहे. मात्र वेगळ्या उमेदवाराबाबत देखील भाजपा पक्षश्रेष्ठी जळगाव विधानसभेसाठी चाचपणी करीत आहेत का ? हा देखील सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे. कारण उमेदवार बदलाच्या अनेक चर्चा घडवून आणल्या जात असताना तशी राजकीय परिस्थिती देखील येऊन ठेपली आहे. भाजपामध्ये इच्छुक उमेदवारांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे त्यामुळे भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची इच्छुकांची समजूत काढताना दमछाक उडणार आहे.
भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी नगरसेवक आबा कापसे हे गेल्या अनेक वर्षापासून महापालिका निवडणुकांमध्ये नेतृत्व करीत आहे. पिंप्राळा उपनगरात सातत्याने महापालिका निवडणुकांमध्ये विजयश्री खेचून आणण्यात त्यांनी यश मिळवले आहे. राजकीय अनुभव तसेच जन माणसात असलेल्या जनसंपर्काच्या ताकदीवर ही ” निवडणूक मी लढेल आणि जिंकेल ” असा दावा भाजपाचे ज्येष्ठ नेते आबा कापसे यांनी केला आहे. मला किंवा उच्चशिक्षित असलेल्या भाजपाचे माजी नगरसेवक राहिलेल्या मयूर कापसे यांना उमेदवारी पक्षाने द्यावी याबाबत पक्ष श्रेष्ठी यांच्या कडे मागणी केली आहे. उच्चशिक्षित असलेल्या मयूर कापसे यांना माझ्या ऐवजी संधी मिळाल्यास अधिक उत्तम होईल असे देखील त्यांनी म्हटले आहे. आमच्या उमेदवारीबाबत पक्षश्रेष्ठींनी विचार न केल्यास परिस्थितीनुसार वेगळा विचार केला जाईल असे देखील आबा कापसे यांनी राजमुद्राशी बोलताना सांगितले आहे.