राजमुद्रा : राज्यात विधानसभेचे वारे वाहू लागले असताना महायुतीचा घटक पक्ष असलेल्या अजित पवार गटाला युतीतून बाहेर काढण्यासाठी भाजप आणि शिंदे गट जाणीवपूर्वक कोंडी करत असल्याची चर्चा सुरू आहे. जेणेकरून अजित पवार स्वतः युतीतून बाहेर पडावे, मात्र अशातच आता अजित पवार यांचे विश्वासू सहकारी सुनील तटकरे यांना केंद्रात महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.सरकारच्या पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस कमिटीच्या चेअरमनपदी सुनिल तटकरे यांची वर्णी लागली आहे
त्यामुळं त्यांचे राजकीय वजन नक्कीच वाढणार आहे. मात्र दुसरीकडे अजित पवार यांनी महायुतीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यास सुनील तटकरे यांना देण्यात आलेले समितीचे अध्यक्षपद कायम राहणार का, हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान या समितीमध्ये एकूण 31 सदस्य असतात. यापैकी 21 लोकसभा आणि 10 राज्यसभेचे सदस्य असतात. पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस संबंधित एखादा विषय सभागृहात चर्चेला येणार असेल तर ही समिती त्या विषयाची तपासणी करणे. त्याचा अहवाल सभागृहाला सादर करण्याची जबाबदारी या समितीवर असते. विधानसभेच्या तोंडावर सुनील तटकरे यांना मिळालेली केंद्रातील महत्त्वाची जबाबदारी त्यांचे राजकारणातील वजन नक्कीच वाढवणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महामंडळाचे अध्यक्ष पद आमदारांना देऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला होता. यामध्ये त्यांनी शिंदे गटाच्या संजय शिरसाट यांना सिडको तर भरत गोगावले यांना एसटी महामंडळाचे अध्यक्षपद देण्यात आले होते. या सगळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना काहीच न मिळाल्याने अजित पवार नाराज असल्याची चर्चा होती. त्यामुळे अजित पवार यांची वाटचाल महायुतीमधून बाहेर पडण्याच्या दिशेने सुरु आहे, या चर्चेला उधाणाला असतानाच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्वासू सहकारी सुनील तटकरे यांना केंद्रात मोठी जबाबदारी मिळाली आहे..