राजमुद्रा : राज्यात विधानसभेचे वारे वाहू लागले असताना सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधनी सुरू केली आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाचे (Central Election Commission) पथक दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी रात्री मुंबईत दाखल झाले आहे. अशातच आता या पथकाची महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांनी भेट घेत ‘फोन टॅपिंग’चे आरोप झालेल्या रश्मी शुक्ला यांना राज्याच्या पोलिस महासंचालकपदावरून तातडीने हटविण्यात यावे, अशी मागणी केंद्रीय निवडणूक आयागोच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने केंद्रीय निवडणूक आयोगाचे पथक राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत आहे. अशातच आता काँग्रेस पक्ष शुक्ला यांना पदावरून हटविण्याच्या मागणीसाठी आग्रही आहे.या राज्याच्या पोलिस महासंचालकपदावर राहिल्या तर त्या आपल्या पदाचा गैरवापर करतील, अशी तक्रार करून त्यांची इतर विभागात तातडीने बदली करण्यात यावी, अशी मागणी महाविकास आघाडीमधील काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि आम आदमी पक्ष यांनी ही मागणी केली आहे. यावर आता केंद्रीय निवडणूक आयोग काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान याआधी गेल्या दोन दिवसांपूर्वी काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही पत्र लिहून रश्मी शुक्ला यांना पदावरून हटविण्यात यावे, अशी मागणी केली हेाती. त्यामुळे शुक्ला यांना पदावरून हटविण्यासाठी काँग्रेस पक्ष आग्रही असल्याचे दिसून येत आहे. विधानसभेच्या तोंडावर महायुती आणि महाविकास आघाडी कामाला लागली असून फोन टॅपिंग प्रकरणाचा आरोप झालेल्या रश्मी शुक्ला चांगल्या चर्चेत आल्या आहेत. आता महाविकास आघाडीतील नेत्यांनी त्यांना पदावरून हटवण्याच्या केलेल्या मागणीवर आयोग काय उत्तर देणार आहे पाहणे महत्वाच ठरणार आहे.