राजमुद्रा : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून मतदारसंघात बैठकांचा सभांचा धडाका लावला जात आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटानेही जोरदार मोर्चे बांधणी केली असून मिशन विदर्भ चालू केले आहे.उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि आमदार भास्कर जाधव हे सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. नुकताच त्यांनी पूर्व विदर्भातील पदाधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतलीय. दरम्यान,पूर्व विदर्भातील 28 पैकी 14 जागांवर शिवसेना ठाकरे गटाकडून दावा करण्यात आला आहे.
आगामी निवडणुकीसाठी पूर्व विदर्भातील 28 विधानसभा मतदारसंघाचा शिवसेना ठाकरे गटाकडून आढावा घेतला जात आहे.. यात नागपूर जिल्हात 5 जागेवर उबाठाचा दावा केला असून रामटेक, कामठी, उमरेड आणि शहरातील नागपूर दक्षिण आणि नागपूर पूर्वची मागणी आम्ही करणार असल्याचे आमदार भास्कर जाधव यांनी म्हटले आहे.तर दुसरीकडे महायुतीही विदर्भासाठी करुणानिती तयार करत आहे. या पार्श्वभूमीवर आता विधानसभा 2024 मध्ये विदर्भातून भाजपच्या आधिक जागा वाढवण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पक्षाच्या रणनीतीचा आढावा घेण्यासाठी नुकतेच येऊन गेले आहेत. त्यामुळे विदर्भावरून ही महायुती आणि महाविकास आघाडीत रस्सीखेच पाहायला मिळणार आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला विदर्भात मोठे यश आले.. महायुतीला चांगला फटका देत महाविकास आघाडीने एकट्या विदर्भातील 10 पैकी 7 ठिकाणी यश मिळवलं होतं. आता आगामी विधानसभेसाठी ही महाविकास आघाडी पूर्ण जोमाने तयारीला लागली असून आघाडीतील घटक पक्षाने विदर्भात चाचणी करायला सुरुवात केली आहे.दरम्यान, उद्या उद्धव ठाकरे हे नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वरला येणार आहे. पूर्व विदर्भातील जागाबाबत शक्य झाले तर उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय घेऊ, असेही ते म्हणाले आहेत. त्यामुळे मिशन विदर्भ आगामी निवडणुकीसाठी ठाकरेंसाठी महत्त्वाचे असणार आहे.