राजमुद्रा : आगामी होणाऱ्या विधानसभेसाठी जागावाटपावरून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये धुसफूस सुरू असताना आता काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे..महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) जागावाटप जाहीर होण्यापूर्वीच प्रणिती शिंदे यांनी सोलापूर शहर मध्य मतदसरसंघावर दावा ठोकला आहे. काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असलेला कार्यकर्ता सोलापूर शहर मध्य मतदारसंघाचा उमेदवार म्हणून विधानसभेची निवडणूक लढवेल, असे त्यांनी (Praniti Shinde) यांनी जाहीर करून टाकले, त्यामुळे महाविकास आघाडीतील वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.
विधानसभेच्या तोंडावर महाविकास आघाडीत सोलापूर शहर मध्य मतदारसंघाच्या जागेवरून धुसफूस सुरू आहे. मित्रपक्ष मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी सोलापूर शहर मध्य मतदारसंघावर दावा केला आहे. तो काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी फेटाळून लावत सोलापूर शहर मध्य मतदारसंघावर दावा ठोकला आहे.त्यामुळे उद्योजक शिखर पहाडिया यांच्या उमेदवारीच्या चर्चेवर त्यांनी पडदा टाकला आहे.
दरम्यान गेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून प्रणिती शिंदे यांना इंडिया आघाडीतील मित्रपक्ष असलेले माकपचे माजी आमदार नरसय्या आडम (Narsayya Adam Master) यांनी पाठिंबा दिला होता. त्याचवेळी सोलापूर शहर मध्य मतदारसंघ माकपला सोडण्याबाबत सोनिया गांधी आणि सीताराम येचुरी यांच्यामध्ये चर्चा झाली आहे, असेही आडम मास्तर यांनी सांगितले होते.दरम्यान, खासदार प्रणिती शिंदे यांनी माजी आमदार आडम मास्तर यांची विनंती फेटाळून लावत सोलापूर शहर मध्य मतदारसंघ काँग्रेस पक्षच निवडणूक लढवेल, असे जाहीर केले आहे, त्यामुळे आडम मास्तर यांच्यासह राष्ट्रवादीतील इच्छुकांचेही टेन्शन वाढविले आहे.