राजमुद्रा : राज्यात विधानसभेचे वारे वाहू लागले असताना गेल्या काही महिन्यांपासून राहिलेल्या मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवा सेनेने १० पैकी १० जागा पटकावत सिनेटवर झेंडा फडकवला आहे. अपक्ष आणि भाजपपुरस्कृत ‘अभाविप’च्या उमेदवारांना पराभवाची धूळ चारत युवा सेनेने सिनेट निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला आहे.. त्यानंतर आता आज ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर शिवसेनिकांनी युवा सेनेच्या विजयाचा जल्लोष साजरा करत आदित्य ठाकरे आणि वरुण सरदेसाई यांना खांद्यावर घेऊन जल्लोष साजरा केला . या विजयानंतर सिनेट निवडणुकीचा निकाल ही तर सुरुवात आहे ती म्हणजे विधानसभा विजयाची अशा शब्दांत युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी महायुतीला ठणकावले.
आजपासूनची विजयाची सुरुवात आहे. गुलाल उधळला आहे. हाच गुलाल विधानसभेच्या निवडणुकीला उधळायचा आहे. त्यासाठी कामाला लागा. आपल्यावर जनतेने जो विश्वास दाखवला आहे. तोच विश्वास उद्धव ठाकरेंवर जनता विश्वास दाखवल्याशिवाय राहणार नाही. आपल्यासाठी काम करणाऱ्या सर्वांना शुभेच्छा देतो, असं आदित्य ठाकरे म्हणाले.दरम्यान निवडणूक झाली तर पराभव हा निश्चित, ही भीती महायुतीला सतावत असल्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती घेत नाही. मिंधेंकडून निवडणूक थांबवण्याचे प्रयत्न होत होते, पण मी कोर्टाचे आभार मानतो, असेही ते म्हणाले. यावेळी वरुण सरदेसाई यांचंही आदित्य ठाकरेंनी कौतुक केलं. वरुणचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. सर्व गणितं वरुण मांडत असतो. मी परवा चिडवत होतो की वरूण स्थगिती येईल बघ. आपल्या सर्व टीमने प्रचंड मेहनत घेतली असेही त्यांनी म्हटले .
ते पुढे म्हणाले , जय महाराष्ट्र, सर्वांचं अभिनंदन करतो. विजय काय असतो हे काल दाखवून दिलं आहे. करून दाखवलं आहे. ही सुरुवात आहे. असाच विजय विधानसभेत मिळवायचा आहे. सर्वात पहिला सन्मान राजन कोळंबकर यांचा करायचा आहे. राजन यांनी निष्ठा काय असते हे दाखवून दिलं आहे. मागच्या दोन्ही टर्ममध्ये ते सिनेट सदस्य होते.यावेळी त्यांना सांगितलं तुम्हाला थांबावं लागेल. काही चेहरे बदलायचे आहेत. नवीन नावं द्यायचं आहे. ते म्हणाले, तुम्ही कुणालाही उमेदवारी द्या. मी दहाच्या दहा लोकांना निवडून आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला.