राजमुद्रा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी शिंदे-फडणवीस-पवार सरकार मतदारांसाठी घोषणांचा पाऊस पडत आहे.. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे यामध्ये देशी गायीला ‘राज्यमाता-गोमाता’घोषित करण्यात आले आहे. यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’मधून ‘राज्यमाता-गोमाता’ वरुन शिंदे सरकार, भाजपवर टीकास्त्र डागले आहे. लोकसभा निवडणुकीत ‘बैल’ चालले नाहीत. त्यामुळे राज्यातील सत्ताधाऱ्यांनी आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गायींना मंचावर आणले आहे, अशी गंभीर टीका ‘सामना’च्या अग्रलेखात करण्यात आली आहे.
राज्यातील सत्ताधाऱ्यांनी आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गायींना मंचावर आणले आहे. मात्र लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीत ही राज्यातील जनता या सरकारला गोठ्यात ढकलणार हे निश्चित आहे. त्यामुळे ‘राज्यमाता’ बनविण्याचा निर्णय हे गायींच्या नावाने दंगली घडविण्याचे कारस्थान असू शकते, अशी भीती अग्रलेखातून व्यक्त करण्यात आली आहे.. आताच्या शेतकऱ्यांची अवस्था ही वाईट असून राज्यमातां’चा भार शेतकऱ्यांवर टाकू नका. आधीच शेतकऱ्यांची अवस्था भाकड गायी, बैलांप्रमाणे झाली आहे. अशा वेळी शेतकरी भाकड गायींचे पालनपोषण करणार तरी कसे? असा सवाल ही सामनातून उपस्थित करण्यात आला आहे.
भारताच्या दुग्ध विकासात व त्याबाबतच्या अर्थव्यवस्थेत या प्राण्यांना महत्त्व आहे. आता गायी म्हाताऱ्या होतात, त्या दूध देत नाहीत, शेतकरी त्यांचे पालनपोषण करू शकत नाहीत, अशा भाकड गायींचे करायचे काय? या प्रश्नाचे उत्तर सरकारकडे नाही. गोवंशहत्या नाही हे धोरण ठीक, पण ते देशभरात लागू नाही असेही सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे. दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी महायुती सरकार अशा विविध घोषणांचा पाऊस पाडत असल्याचा हल्लाबोल सामना अग्रलेखातून करण्यात आला आहे.