राजमुद्रा : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. अशातच आता केंद्रीय मंत्री नारायण राणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी वर्षा बंगल्यावर पोहोचले आहेत. गेल्या एक तासापासून त्या दोघांच्यामध्ये खलबत सुरू असून त्या बैठकीत काय चर्चा झाली असेल याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
यंदाची विधानसभा निवडणूक महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी होणार आहे. सध्या या अनुषंगाने विविध बैठका होत आहेत.
केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकताच महाराष्ट्र दौरा केला होता. तेव्हा त्यांनी सर्वच पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केली होती. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे. असे असताना आता विधानसभा निवडणुकीची चाहूल लागली आहे. त्यातच आता भाजपचे ज्येष्ठ नेते आणि विद्यमान खासदार नारायण राणे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आला आहे.दरम्यान, नारायण राणे हे कोणत्या कारणासाठी भेट घेत आहेत याची माहिती अद्याप मिळू शकली नाही.
दुसरीकडे सह्याद्री अतिथीगृहावर मंत्री अमित शाह यांची महायुती आणि भाजपच्या नेत्यांसोबत बैठक सुरु आहे. महायुतीचा राज्यातील नेत्यांची वादातीत जागांवर चर्चा पार पडल्यानंतर आजच्या बैठकीत अमित शाह यांच्याकडे या जागांची माहिती देण्यात येणार आहे. या बैठकीपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजप नेते गणेश नाईक यांनी अमित शाह यांची भेट घेतली आहे. दरम्यान या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही बैठकांचा सपाटा लावला आहे.